पुणे,दि.०७:-पुणे शहरात निर्बंधांमध्ये शिथिलतेची मागणीचा प्रस्ताव पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सादर केला आहे. तो प्रस्ताव देताना गेल्या तीन आठवड्यातील बाधितांची आकडेवारीही जोडण्यात आली असून, त्यामध्ये बाधितदर 4 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे दिसून आले आहे. शिथिलता हवी असल्यास तसा प्रस्ताव पुणे महापालिकेकडून पाठवावा, अशी भूमिका टोपे यांनी जाहीर केल्यानंतर महापौर मोहोळ यांनी तसा प्रस्ताव सादर केला आहे.’उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली दर आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या बैठकीत पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात अनेकदा मागणी केली आहे.त्यावर पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली परंतु तसे आदेश मात्र काढले नाहीत,’ अशी खंत महापौर मोहोळ यांनी या प्रकरणात व्यक्त केली आहे.
शहरातील करोना संसर्ग स्थिती किती नियंत्रणात आहे, हे सांगण्यासाठी अलीकडच्या कालावधीतील आकडेवारी पुरेशी आहे. शिवाय गेल्या 16 महिन्यांच्या कालावधीत समस्त पुणेकरांनी राज्य सरकारच्या आदेशाचे पालन केले आहे. मात्र, सद्यस्थितीत दुपारी 4 पर्यंतची वेळ सर्वांसाठीच अडचणीची ठरत असून, व्यावसायिक, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांची सर्वांचीच निर्बंधांत शिथिलता द्यावी, अशी मागणी आहे.
या पार्श्वभूमीवर समस्त पुणेकरांच्या वतीने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करून पुणेकरांना न्याय द्यावा, अशी मागणी मोहोळ यांनी आरोग्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या प्रस्तावाद्वारे केली आहे.
सततच्या निर्बंधामुळे व्यापारी वर्ग हैराण झाला असून, सर्वसामान्यांचा संयमही सुटत चालला आहे. या सहनशीलतेचा अंत बघू नका. जबाबदार वर्तन कसे असायला हवे, हे आता पुणेकरांना सांगण्याची गरज नाही. निर्बंध हटवून त्यांचे आर्थिक व्यवहार सुरळीत होतील, यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याची गरज आहे. त्यामुळे पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांना विनंती केली आहे.
- गणेश बिडकर, सभागृह नेते, मनपा