पुणे दि १३ :- अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने मुलांच्या १७ व २१ वषार्खालील गटात दणदणीत विजय मिळवित खो खो मध्ये झोकात सलामी केली.महाराष्ट्राने १७ वर्षाखालील मुलांच्या एकतर्फी लढतीत गुजरातला ११-९ असे दोन गुण व साडेसात मिनिटे राखून पराभव केला. त्याचे श्रेय दिलीप खांडवी (२ मि.१० सेकंद व १ मिनिट ४० सेकंद), रोहन कोरे (२ मि, २ मि.२० सेकंद तसेच तीन गडी), अभिषेक शिंदे (नाबाद दीड मिनिटे व एक मिनिट ४० सेकंद) यांना द्याावे लागेल. गुजरातकडून किस्मत दाबी याने चार गडी बाद करीत एकाकी लढत दिली.
तामिळनाडू संघाने मणिूपर संघाचा १४-११ असा एक डाव ३ गुणांनी पराभव केला. त्यामध्ये एम.गोपालकृष्ण (२ मि.५० सेकंद, १ मि.४० सेकंद व ५ गडी), टी. गौतम (नाबाद अडीच मिनिटे, दीड मिनिटे व चार गडी) यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. मणिपूरकडून एम.मनीषसिंग याने दोन मिनिट पळती व दोन गडी अशी कामगिरी करीत चांगली झुंज दिली.
मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने छत्तीसगढ संघाचा २०-१२ असा एक डाव ८ गुणांनी धुव्वा उडविला. महाराष्ट्राकडून अवधूत पाटील (१ मि.१० सेकंद व १ मि.४० सेकंद, तसेच चार गडी), मिलिंद कुरपे (२ मिनिटे व चार गडी), अरुण गुणके (२ मि.२० सेकंद व तीन गडी) यांनी अष्टपैलू कामगिरी केली. छत्तीसगढ संघाकडून नितीनकुमार व किशोरकुमार यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
मुलींच्या १७ वषार्खालील गटात पंजाबने पश्चिम बंगाल संघावर ११-७ असा अनपेक्षित विजय नोंदविला. त्यांच्या हरमानप्रित कौर (४ मिनिटे व २ मिनिटे, तसेच एक गडी), अमरीत कौर (३ मिनिटे)व रमणदीप कौर (पाच गडी) यांनी कौतुकास्पद वाटा उचलला. बंगाल संघाच्या इशिता बिस्वास (दीड मिनिटे, अडीच मिनिटे व तीन गडी) व तृष्णा बिस्वास (२ मि.४० सेकंद) यांनी दिलेली लढत निष्फळ ठरली. खो खो च्या सामन्यांना रविवार पासून प्रारंभ झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहण्यात मिळत आहे