श्रीगोंदा,दि.०८:-श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगांव येथील शेतकऱ्यांनी आपल्या मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी ॲपद्वारे गट नंबरनुसार वेगवेगळ्या पिकांची नोंदणी कशी करावी? याबाबतचे मार्गदर्शन मढेवडगांव येथे नवनियुक्त मंडळाधिकारी जयेश सदाफुले व कोतवाल मिठू गटणे यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचे धडे दिले.
ई-पीक पाहणी प्रबोधन सप्ताह सुरू असून, यामध्ये पीकपेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. ही मोहीम अधिक जलद व सुलभ व्हावी, यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड केल्यानंतर पेरणी केलेल्या पिकांची माहिती भरावयाची आहे. वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी केल्यानंतर गट व खातेनंबर, पिकांची माहिती, हंगामनिहाय माहिती, पिकांची छायाचित्रे काढून ते अपलोड करावे लागत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंदणी करून ई-पीक पाहणी कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन या वेळी मढेवडगांवचे उपसरपंच दिपक गाडे यांनी केले. या वेळी अंबादास मांडे, राजेंद्र ज्ञानदेव शिंदे, संदीप मांडे, अमोल गाढवे, बाळासाहेब मांडे, संजय मांडे, सोमनाथ कुरुमकर, गेना मांडे आदी शेतकरी उपस्थित होते.या अभियानामुळे प्रथमच महसुली कर्मचाऱ्यांनी थेट बांधावर जाऊन शेतकरी वर्गाशी प्रत्यक्ष संवाद साधल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे