पुणे, दि.०९ :-पुणे शहरातील स्वारगेट परिसरात दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 48 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.
गुलटकेडी येथील अट्टल गुन्हेगार रविंद्र उर्फ बल्ली वसंत कांबळे (वय-30 रा. डायस प्लॉट, गुलटकेडी) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहेत. कांबळे याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.
बल्ली कांबळे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह स्वारगेट, खडक , विश्रामबाग चंदननगर पोलीस ठाण्याच्या परिसरात तलवार, कोयता, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत, अनैसर्गिक अपराध, बाललैंगिक अपराध यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्हे स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी आरोपी कांबळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन
गुन्हेगारावर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 48 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर व पी.सी.बी. गुन्हे शाखा
वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी ही कामगिरी केली