पुणे दि.०९ :-हवेली तालुक्यात कोलवडी येथील मे.बोरमलनाथ गुळ उद्योगातील गुऱ्हाळावर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत भेसळीच्या संशयावरून ९८ हजार २४० रुपये किंमतीचा ३०७० किलो गुळ आणि २ लाख २९ हजार ५३० रुपये किंमतीची ६५५८ किलो साखर असा ९६२८ किलो साठा जप्त करण्यात आला.
पुणे विभागाचे सहआयुक्त शि.स. देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी अ.ध.झांजुर्णे यांनी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे या गुऱ्हाळावर धाड टाकली. यापुढेदेखील अन्न व औषध प्रशासनातर्फे अशा स्वरुपाची कारवाई सुरू ठेवली जाणार असून नागरिकांनी अन्न भेसळीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन परिमंडळ ३ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) सा.ए.देसाई यांनी केले आहे.
गुटखा विक्रेत्याकडून १० लाखाचा साठा जप्त
परिमंडळ ५ चे सहाय्यक आयुक्त (अन्न) सं.भा.नारागुडे यांना प्राप्त माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर, रा.भि.कुलकर्णी यांच्या पथकाने आज पहाटे ५ वाजता गुटखा विक्रेता राजु मलबारे यांच्या घरासमोरील वाहनामधून १० लाख ४४ हजार ४०० रुपयांचा पानमसाला, सुगंधीत तंबाखू आणि सुगंधीत सुपारी साठा जप्त केला. कारवाईत ७ लाख रुपये किंमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले असून यवत पोलिस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधिताविरोधात यवत पोलिस स्टेशन येथे भा.दं.वि. कलम ३२८ नुसार फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
नागरिकांनी गुटखा, पानमसाला विक्रीबाबत १८००२२२३६५ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन श्री.नारागुडे यांनी केले आहे.