पुणे, दि.१३ :-पुणे परिसरात काही ठिकाणी अवैद्य सावकारी करुन पैसे उकळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासंदर्भात पुणे शहर पोलिसांकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी संबंधित सावकारावर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे तर काही सावकारांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांनी मागील वर्षभरात 18 सावकारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांना खासगी सावकाराविरुद्ध तक्रार करता यावी यासाठी पुणे पोलिसांनी 9145003100 हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. त्यामुळे नागरिकांना या क्रमांकावर व्हॉट्सअॅप द्वारे तक्रार नोंदवता येणार आहे.
शहरात मागील वर्षभरात सावकारीच्या तक्रारीत वाढ झाली आहे. या माध्यमातून नागरिकांना दमदाटी करुन पैसे उकळण्यात येत आहेत. अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी विविध पथके तयार करुन कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. यानुसार शहरात 1 जानेवारी ते आजपर्यंत एकूण 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महाराष्ट्र सावकारी कायदा कलम व भारतीय दंड विधान कलमांतर्गत ही कारवाई करण्यात येत आहे.
सावकाराकडून अधिकच्या पैशासाठी तगादा लावला जातो. सावकाराविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुणे पोलिसानी व्हॉट्सअॅप नंबर सुरु केला आहे. या नंबरवर नागरिकांना घरबसल्या तक्रार करता येणार आहे. नागरिकांनी सावकारीसंदर्भात काही तक्रार असल्यास या नंबरचा वापर करावा असे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे.
परिमंडळ निहाय गुन्हे
- परिमंडळ 2 – 2 गुन्हे दाखल
- परिमंडळ 3 – 2 गुन्हे दाखल
- परिमंडळ 4 – 1 गुन्हा दाखल
- परिमंडळ 5 – 4 गुन्हे दाखल
- गुन्हे शाखा – 9 गुन्हे दाखल
एकूण – 18 गुन्हे दाखल