नाशिक,दि.२३ : – खून, हाणामारीचे काही गुंडांकडून दहशत करण्याचा प्रकार वाढल्याने नाशिक शहर पोलिसांनी म्हसरूळ, पंचवटी व उपनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी (दि.22) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले.त्यात तडीपार, हिस्ट्रीशिटर, पाहिजे असलेले, फरार, वॉरंटमधील गुन्हेगारांची शोधमोहीम घेण्यात आली.
नाशिक शहरात गेल्या आठवडाभरात एकापाठोपाठ एक असे पाच खून झाले. त्याचप्रमाणे हाणामारीचेही प्रकार वाढले आहेत. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाइकनवरे यांनी ज्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खून झाले. तेथील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार मध्यरात्री 1 ते 4 दरम्यान, तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबवण्यात आली.दरम्यान, त्यात तडीपार असतानाही शहरात वास्तव्य करणार्या तिघांना पकडले. 10 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची धरपकड केली. जामीनपात्र व अजामीनपात्र गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या सहा गुन्हेगारांनाही ताब्यात घेतले. या मोहिमेत दोन सहायक पोलिस आयुक्त, 21 पोलिस अधिकारी, 110 पोलिस अंमलदारांसह दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक सहभागी होते. यापुढेही शहरात कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.