पिंपरी चिंचवड,दि.१५:-पिंपरी चिंचवडचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी बुधवारी (दि.१४) सायंकाळी अंकुश शिंदे यांच्याकडून पदभार स्विकारला. अपर पोलीस महासंचालक विनय कुमार चौबे हे पिंपरी-चिंचवडचे पाचवे पोलीस आयुक्त आहेत. अंकुश शिंदे यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. याबाबतचे आदेश गृह विभागाने मंगळवारी रात्री काढले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘दिशा’ उपक्रम राबवला. याशिवाय बेसिक पोलिसिंगवर भर दिला. यामध्ये कोम्बिंग ऑपरेशनसह गुन्हेगारांवर वॉच ठेवण्यात आला. तसेच शिंदे यांनी स्वत:लॉटरी सेंटरवर व इतर अवैद्य धंद्यावर कारवाई केली. यानंतर ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली त्या पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले तर इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली.दरम्यान, मंगळवारी रात्री अंकुश शिंदे यांची बदली होऊन विनय कुमार चौबे
यांची पिंपरी चिंचवड आयुक्तपदी नियुक्ती गृह विभागाने केली. चौबे यांनी
(बुधवार) सायंकाळी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
कायदा आणि सुव्यवस्था राखण्या बरोबरच सायबर गुन्हे व आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी काम करणार असल्याचे नव नियुक्त पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बरोबर एका तासाच्यावर चर्चा करून येथील परिस्थितीची माहिती घेतली.
पिंपरी चिंचवडमध्ये कोणत्या कार्याला प्राधान्य देणार असे विचारले असता, चौबे म्हणाले की, ‘कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच सायबर गुन्ह्यांवर देखील लक्ष देणार. तसेच, इकॉनॉमिक ऑफ्फेन्सेस (आर्थिक गुन्हे) वाढत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरही लक्ष ठेवणार.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्ताल्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे अजूनही नाही. याबाबत विचारले असता, चौबे म्हणाले की, ‘फक्त पोलीस ठाणे असून चालत नाही, तर ट्रेंड मॅनपॉवरही (प्रशिक्षित मनुष्यबळ) केस सोडवण्यासाठी गरजेचे आहे. मुंबईमध्ये 5 क्षेत्र आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी एक सायबर पोलीस ठाणे आहे. तसेच, केंद्रीय स्तरावर डीसीपी (उप आयुक्त) लेव्हलवरही आहेत. छोट्या केस पोलीस ठाण्याच्या लेव्हलवर सॉल्व होतात. सायबर पोलीस ठाणे हे पिंपरी चिंचवडमध्ये केंद्रीय स्तरावर असणे योग्य राहील, की स्थानिक पोलीस ठाणे स्तरावर योग्य राहील. या विषयी आम्ही चेक करू. ‘
पुढच्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. याविषयी विचारले असता चौबे म्हणाले की, ‘निवडणुकांच्या पूर्वी लागणारी सर्व योग्य कारवाई आम्ही करू. कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काम करू’, असे मत विनयकुमार यांनी व्यक्त केले.