सातारा,दि.२८ :- सातारा लोकसभेची निवडणूक लढणार, असल्याचे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारीवरून चाललेल्या चर्चांना पूर्णविराम दिला.
मी कमळाच्या चिन्हावर उमेदवारी लढणार, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खासदार उदयनराजे भोसले यांचे दिल्लीतून काल साताऱ्यात आगमन झाल्यानंतर शिरवळ येथे जिल्ह्याच्या हद्दीवर उदयनराजे यांचे त्यांच्या समर्थकांनी जल्लोषात स्वागत करत शक्तिप्रदर्शन केले. या वेळी उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
उदयनराजे म्हणाले, ”माझ्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. हे पाहून मला काय बोलावे ते सुधारत नाही. कालही मी जनतेचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही माझ्याकडून लोकहिताची कामे होत राहतील. महायुतीची उमेदवारांची यादी जाहीर नाही, नाव जाहीर नाहीत, यावर उदयनराजे म्हणाले, ”या शक्तिप्रदर्शनातून माझा कोणालाही इशारा नाही. उमेदवारांची यादी जाहीर होईल. सगळे निश्चित झालेले आहे. मी निवडणूक लढणारच आहे. दिल्लीत गेल्यानंतर मी आज प्रथमच साताऱ्याला आलो आहे. माझे भव्य स्वागत केले त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो.
दिल्लीला याअगोदरही माझे विविध कामानिमित्ताने दौरे सुरू होत होते; पण मला ताटकळत ठेवले, असे काहीही नाही. लोकसभेच्या निवडणुकीची देशभरात प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणाऱ्या मतदारसंघात महायुतीत काही जागांवरून तेढ निर्माण झाली होती. ती सोडविण्याचे काम झाले आहे. आता कोणतीही शंका नाही.” उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीची यादी आज (गुरुवारी) जाहीर होईल, असे सांगितले आहे. यावर पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचे ते सांगितले आहे, असे सांगून उदयनराजेंनी आपले तिकीट निश्चित झाल्याचे संकेत दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. आता यात शंका घेण्याची गरज नाही. तिकिटाच्या विषय आता वेगळं सांगायची गरज नाही.
–उदयनराजे भोसले, खासदार, राज्यसभा