पुणे,दि.११:- पुणे शहरातील काही चौका चौकांत सिग्नलला व धार्मिक कार्यक्रमात जाऊन नागरिकांकडे जबरदस्तीने पैशांची मागणी करणाऱ्या तृतीयपंथीयांवर होणार कारवाई. याबाबतचे आदेश पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी (ता.
१०) दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी वाहतूक शाखा,व पोलिस ठाण्यातील कर्मचारी आणि बीट मार्शलकडून करण्यात येणार असल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.
लग्न समारंभ, विविध सण, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, बारसे, नामकरण विधी अशा कार्यक्रमात जाऊन तृतीयपंथीयांकडून पैशांची मागणी केली जाते. निमंत्रण नसताना बऱ्याचदा पैशांसाठी जबरदस्ती केली जाते. शहरातील मुख्य चौकांमध्ये, बाजारपेठांमध्ये तृतीयपंथीयांकडून वाहनचालक आणि नागरिकांना पैशांसाठी त्रास देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून नियमावली तयार करण्यात आली आहे.
पुणे शहरात सीआरपीसी कलम १४४ नुसार निर्देश लागू करण्यात आले आहेत. तृतीयपंथीयांना नागरिकांच्या घरी आणि दुकानांमध्ये जाऊन जबरदस्तीने पैसे मागण्यास मनाई राहील. लग्न, बारसे, अंत्यविधी, उत्सव अशा कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये निमंत्रणाशिवाय जाता येणार नाही.
मुख्य चौकांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पैशांची मागणी केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास खंडणीचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. तसेच, भिक्षेकऱ्यांकडून लहान मुलांचा वापर करणे गंभीर गुन्हा आहे. अशा भिक्षेकऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.