पुणे, दि.०३ :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या प्रभावी सार्वजनिक वितरण व्यवस्थेमुळे लाभार्थींना अन्न धान्य, गॅस, रॉकेल, मीठ यांचे वितरण अधिक कार्यक्षमतेने व पारदर्शकतेने होत आहे. प्रत्येक शिधापत्रिका धारकाला अन्न धान्य देण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचे मत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, अन्न वऔषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले.
येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील कौन्सील हॉलमध्ये अन्न धान्य वितरण विभागाच्या ई-पॉस पावती आधारित लॉटरी सोडत पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रम पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार मेधा कुलकर्णी, चंद्रकांता सोनकांबळे, ॲड. विवेक चव्हाण, चिंतामणी जोशी, पुरवठा उपआयुक्त निलीमा धायगुडे, अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे आदी उपस्थित होते.
श्री. बापट पुढे म्हणाले की, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील ग्राहकांचा सहभाग वाढविण्यासाठी रेशन ग्राहकांसाठी आता ई-पॉस पावती आधारित बक्षीस योजना सुरु करण्यात आली आहे. रेशनवरील अन्न धान्य घेतल्यानंतर मिळणाऱ्या ई-पॉसच्या पावतीच्या क्रमांकातून दर महिन्याला लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्यातील विजेत्या ग्राहकांना वस्तू स्वरुपात बक्षीस देण्यात येणार आहे. राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रीक ओळख पटवून ई-पॉसव्दारेअन्न धान्याचे वितरण केले जाते त्यावेळी लाभार्थ्यांना पावती दिली जाते. याबाबत मोठया प्रमाणात जागृकता व्हावी. ग्राहकांना पावती घ्यावयाची सवय लागावी. त्यातून दुकानदारांना ग्राहकाला पावती देणे बंधनकारक व्हावे या हेतुने जिल्हास्तरावर ही नावीन्यपूर्ण बक्षीस योजना राबविण्याचा आपण निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र व्दारे संगणक प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. ई- पॉसव्दारे निघणाऱ्या पावतीतून या प्रणालीव्दरे एक क्रमांक निवडण्यात येऊन या योजनेअंतर्गत प्रत्येक रेशन दुकानातून एक, प्रत्येक तालुक्यातून एक, प्रत्येक जिल्हयातून एक लाभार्थी आणि जिल्हयातून एक दुकानदार दरमहा निवडला जावून बक्षीस दिले जाणार आहे.
रॉकेल विक्रेत्यांच्या कमीशनमध्ये ४५० रु. वरुन आता ६७५ रु. प्रति किलो लिटर इतकी वाढ करण्यात आली आहे. राज्य शासनाने अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी वाढविण्याचाही निर्णय घेतला आहे. दुकानदारांचेही कमिशन ७० वरुन १५० वर करण्यात आले आहे. ग्राहकांनाही ऑनलाईनव्दारे पैसे भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. पाहिजे त्या सोयी सुविधा रेशन दुकानदारांना पुरवल्या जातील. चांगले काम करणाराचे कौतुक झालेच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या.
आमदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, अन्न धान्य वितरण विभाग चांगले काम करत आहे. या विभागाकडून अन्न धान्य वितरण करतांना खऱ्या गरजु लाभार्थ्यांपर्यंत वितरण होत असल्याने प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरांमध्ये धान्य पोहचवू लागले आहे. हा चांगला उपक्रम आहे असेही त्या म्हणाल्या.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागीय तांत्रिक अधिकारी, परिमंडळ अधिकारी, पुरवठा निरीक्षक, स्वस्त धान्य दुकानदार यांना प्रशस्तीपत्रक वाटप, प्रथम क्रमांक इलेक्ट्रीकल दुचाकी ११ परिमंडळ कार्यालयाचे ११ लाभार्थीं, व्दितीय क्रमांक प्रेशर कुकर ११ परिमंडळ कार्यालयाचे ११ लाभार्थी यांना वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरवठा उपआयुक्त निलीमा धायगुडे यांनी केले तर अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.