पुणे ग्रामीण,दि.०९ :- भाडेकरूंची माहिती न दिल्याने पुण्यातील घरमालक सुशांत सुनील ढवळे (वय ३२, रा. अभंग वस्ती, वारूळवाडी, ता. जुन्नर) यांच्यावर नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नारायणगाव पोलिसांनी घर मालकावर आठवडाभरात केलेली ही दुसरी कारवाई आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी दिली. दरम्यान घरमालकांनी भाडेकरार करून भाडेकरूंची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्यात द्यावी. असे आवाहन पोलिसांनी केले होते व
सुशांत ढवळे यांनी वारूळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अभंग वस्ती येथे इतर राज्यातून व जिल्ह्यातून आलेल्या पाच कुटुंबांना पाच खोल्या भाड्याने दिल्या होत्या. हे भाडेकरू मागील पाच वर्षांपासून या खोल्यांमध्ये राहत होते. त्यांनी भाड्याने ठेवलेल्या भाडेकरूंबाबत नारायणगाव पोलिस स्टेशनला माहिती दिली नाही.
पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांनी दिलेल्या आदेशानुसार घरमालकाने ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यास देणे बंधनकारक आहे. याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्याच्या वतीने वेळोवेळी आवाहनही केले होते. मात्र याकडे सुशांत ढवळे यांनी दुर्लक्ष करून आदेशाचे उल्लंघन केले. याबाबत पोलिस कर्मचारी दत्तात्रेय सोपान ढेंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुशांत ढवळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.