पिंपरी चिंचवड,दि.२६:- पुण्यातील चाकण परिसरातील राहणारा तरुणाने यू-ट्युबवरुन चक्क वाहनचोरीचे प्रशिक्षण घेतले तब्बल १८ दुचाकी चोरल्या आहे.
युट्युबवर व्हिडीओ पाहून वाहन चोरी कशी करायची, याची माहिती घेत 18 दुचाकी चोरणाऱ्या तरुणाला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली आहे.
अभिषेक मल्लाप्पा हावळेकर (वय 21, रा. आंबेठाण, चाकण. मूळगाव साई दर्शन कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 ऑगस्ट रोजी एकाच सोसायटीमधून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. या गुन्ह्याच्या तपासात वाहन चोरी करणारे आरोपी कोणत्या मार्गाने आले आणि गेले याची पाहणी करण्यासाठी 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले. दोघांनी ही वाहने चोरी केल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर अभिषेक हावळेकर याला अटक केल्यावर त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली.
दुचाकी चोरीचे १६ गुन्हे उघडकीस
अभिषेक हावळेकर याने मागील काही महिन्यात हिंजवडीमधून सहा, वाकड, सांगवी, पिंपरी, चिंचवड, चंदननगर, भारती विद्यापीठ, सातारामधून प्रत्येकी एक, चतुश्रुंगीमधून तीन दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले आहे. आणखी दोन दुचाकींच्या मालकांबाबत पोलीस तपास करीत आहेत. या कारवाईमुळे 16 गुन्हे उघकीस आले आहेत.
वाहन चोरीचे युट्युबवर घेतले प्रशिक्षण
आरोपी अभिषेक याचे घरच्यांशी भांडण झाल्याने तो घरातून पुण्याला आला. वाहन चोरी कशी करावी, याबाबत त्याने युट्युबवर व्हिडीओ पाहिले. सीसीटीव्ही कॅमेरे कमी असल्याने तो महामार्गालगत दुचाकी चोरत असे.
कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ निरीक्षक संदीप सावंत, उपनिरीक्षक मयुरेश दळवी, नारायण जाधव,अंमलदार संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, प्रवीण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे, अमर राणे यांनी केली.