पुणे,दि.२६:- पुण्यातील पीएमपीएमएलच्या सेवकांना मूळ वेतनश्रेणीसह कायम करावे यासाठी गेल्या काही वर्षभरापासून सातत्याने प्रयत्नशील असलेले शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या मागणीला यश आले आहे.
त्यानुसार पीएमपी सेवकांना कायम करण्याबाबत महामंडळ प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच सातव्या वेतन श्रेणी प्रमाणे मूळ फरकाची रक्कम चार टप्प्यात देण्यात येणार असल्याबाबतचे पत्रही आज निर्गमित केले आहे.
महामंडळातील 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या बदली कर्मचाऱ्यांचे शेड्युल मान्य कायम जागेवर नियुक्त करण्याबाबत शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी महामंडळाच्या कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले होते. तसेच काहीच दिवसांपूर्वी पुकारलेल्या पीएमपीएमएलच्या डेपो बंद आंदोलनानंतर प्रशासनाने सातव्या वेतनश्रेणीप्रमाणे फरकाची रक्कम चार टप्प्यात देण्यात देणार असल्याचे पत्र निर्गमित केले आहे.
याबाबत शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच महामंडळातील प्रचलित कार्यप्रणाली धोरण कार्यवाहीला अनुसरून 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या बदली कर्मचाऱ्यांचे हजेरी रेकॉर्ड तपासून त्यासंदर्भातील परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. याशिवाय डिफॉल्ट किंवा रेकॉर्ड बाबतची छाननी व तपासणी पूर्ण झाली असून लवकरच पीएमपीएमएलचे 1700 बदली कर्मचारी कायम होणार आहेत, असे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले.