पुणे, दि. २२ :- पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्ता हा शहराची शान असणारा भाग आहे. अलीकडच्या काळात या ठिकाणी रात्री उशिराने येऊन बेकायदेशीरपणे विक्री करण्याचे प्रकार वाढले आहे. हे विक्रेते बाहेरील लोक आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे केली आहे. देशातील कुठल्यातरी राज्याच्या नावावर बेकायदेशीररीत्या भारतात आलेले आणि पुणे शहरात फर्ग्युसन रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांमुळे सुरक्षिततेचे प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यांना विरोध केला जायलाच हवा, असेही त्यांनी नमूद केले.
नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात शिरोळे यांनी उपस्थित केलेल्या शहरातील महत्त्वाच्या प्रश्नांबाबत माहिती देण्याकरीता आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शिरोळे बोलत होते.
फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर रात्री नऊ नंतर वेगळेच लोक येऊन लहान खोक्यांमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करत असतात, हे लोक स्थानिक नसून बाहेरून आलेले आहेत. इथे विक्री करण्याचा व्यवसाय ते बेकायदेशीरपणे करत आहेत, त्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आपण महानगरपालिका आणि पोलीस आयुक्त या दोघांची भेट घेऊन त्यांच्याकडे केली असल्याचे शिरोळे यावेळी म्हणाले.
शिवाजीनगर बसस्थाकाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिरोळे म्हणाले, बसस्थानकाच्या विकासाचे काम हे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून सुरु आहे. या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट लिझ जर अधिक काळ ठेवता आले, तर त्याचा फायदा होणार आहे. सध्या त्यावर काम सुरु असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना हे काम रेंगाळले होते. आपण या कामात कोणताही खोडा घालत नसून हे काम मार्गी लावण्याचे पूर्ण प्रयत्न करत असल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.
पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेल्या पुलापैकी एका पुलाचे म्हणजे राजभवनापासून ते ईस्क्वेरकडे येणाऱ्या पुलाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या महिन्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. बाणेर आणि पाषाणकडे जाणाऱ्या पुलाचे काम देखील अंतिम टप्यात आले असून ते देखील लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. शिवाजीनगर येथील आकाशवाणी चौकातील मेट्रोचा खांब हा वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे, त्यामुळे त्यावर कोणता पर्याय काढता येईल, यावर चर्चा सुरु असून त्यावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला. पावसाळी अधिवेशनात निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधायक चर्चा झाल्या, चांगल्या प्रकारचे निर्णय या वेळी घेण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.
पुण्यामध्ये ओव्हरहेड केबलचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे, त्यामुळे सरकारने त्याबाबतचे डक्ट पॉलिसी तयार करून त्याची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दा शिरोळे यांनी अधिवेशनात लावून धरला होता. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यासाठी समितीची स्थापना करून सरकार धोरण निश्चित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे मेडिकल टुरिझम हब म्हणून विकसित करण्याची सूचना शिरोळे यांनी सरकारकडे केली. त्याचबरोबर पुणे हे डिफेन्स स्टार्टअप आणि उत्पादन केंद्र म्हणून सरकारने जाहीर करण्याची मागणी आणि अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या धरती वर गहुंजे येथे कॉन्सर्ट अरीना करावा अशी सूचना शिरोळे यांनी अधिवेशनात केली होती.
शहरांमध्ये अंडर फ्लायओव्हर रिडेव्हलपमेंट पॉलिसी करावी, शहरात अन्नधान्य वितरणात होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी पुण्यामध्ये पूर्णवेळ अन्नधान्य वितरण अधिकाऱ्याची नेमणूक, सायबर गुन्ह्याचा वाढता धोका लक्षात घेता शहरात पाच ठिकाणी सायबर पोलीस ठाणी निर्माण करण्याच्या प्रस्तावाला सरकारने तात्काळ मंजुरी द्यावी, ऑनलाइन दाखले मिळण्यात विलंब होतो आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियांमध्ये अडचण येते या करिता राज्य शासनाची वेबसाईटची क्षमता वाढवावी अशी मागणी, शहरातील टेकड्यांवर टाकण्यात येणाऱ्या राडा रोडा थांबवण्यासाठी एक सर्वेक्षण करून असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवताना त्याची देखभाल करण्याची यंत्रणा देखील उभी करण्यात यावी, खाजगी जागेतील झाडांच्या फांद्या महानगरपालिकेकडून सवलतीच्या दारात तोडून मिळाव्यात अशा अनेक मागण्या अधिवेशनादरम्यान केल्याचे शिरोळे यांनी नमूद केले.