मुंबई, दि. १३ : -सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2019 साठी दि. 10 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्यानंतर मुंबई उपनगर जिल्ह्यात आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. आतापर्यंत सार्वजनिक मालमत्तेवरील प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहिरातींचे 8 हजार 465 फलक, पोस्टर, बॅनर आणि झेंडे काढून टाकण्यात आलेले आहेत. तर, खाजगी मालमत्तेवरील 2 हजार 226 असे एकूण 10 हजार 691 फलक, पोस्टर,बॅनर आणि झेंडे हटविण्यात आले आहेत.
आचारसंहिता तसेच निवडणूक खर्चाचे पर्यवेक्षण करण्यासाठी भरारी पथक,स्टॅटिक सर्विलन्स टीम, व्हिडीओ सर्विलन्स टीम आणि व्हिडीओ व्हिवींग टीम विधानसभा मतदारसंघ निहाय स्थापित करण्यात आलेल्या आहेत. नवीन मतदार नोंदणीबाबत माहिती आवश्यक असल्यास तसेच आचारसंहितेचा भंग किंवा निवडणुकीच्या खर्चासंबंधी तक्रारीबाबत मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी तक्रार कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आलेला आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यात दिनांक 29 एप्रिल 2019 (सोमवार) रोजी चौथ्या टप्प्यात मतदान होणार असून दिनांक 23 मे 2019 (सोमवार ) रोजी मतमोजणी होणार आहे. या जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ आहेत, त्यात 26 विधानसभा मतदारसंघ अंतभूर्त आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी,मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविली आहे.