पुणे, दिनांक २७ :-जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची बैठक जिल्हा माहिती कार्यालयात संपन्न झाली. जिल्ह्यातील मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर या लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेड न्यूज (प्रदत्त बातमी) आणि दृक-श्राव्य माध्यमातील जाहिरातींच्या प्रसारणपूर्व परवानगीबाबत बैठकीत चर्चा झाली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, पत्र सूचना कार्यालयाचे महेश अयंगार,आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा. योगेश बोराटे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सहसंचालक नंदिनी आवडे, उप जिल्हाधिकारी सुधीर जोशी, टी. पी. शर्मा, एस. बी. निकम,उपसंचालक (माहिती) मोहन राठोड,जिल्हा माहिती अधिकारी व समितीचे सदस्य-सचिव राजेंद्र सरग आदी उपस्थित होते.
नवीन मध्यवर्ती इमारतीतील तळमजल्यावर जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राजकीय जाहिरातींची प्रसारणपूर्व परवानगी या कक्षातून दिली जाणार आहे, तसेच पेड न्यूजबाबतही कार्यवाही केली जाणार आहे. टीव्ही चॅनेल्स, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मिडीयावरील दृक-श्राव्य (ऑडिओ-व्हीज्युअल) जाहिरातींच्या प्रसारणपूर्व परवानगीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत जाहिरात चित्रफित अथवा ध्वनीफितीच्या दोन सिडी. प्रस्तावित जाहिरातीच्या साक्षांकीत अनुप्रमाणीत केलेला प्रतिलेख (ॲटेस्टेड ट्रान्सस्क्रीप्ट) दोन प्रतीत. जाहिरात/मजकूर तयार करण्यासाठी आलेल्या खर्चाचा तपशील. जाहिरात प्रसारित करण्याचे माध्यम. जाहिरात प्रसारणाचा कालावधी, वेळ. (केबल टिव्ही,रेडीओ आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यम असल्यास त्याच्यात प्रसारित करण्यात येणाऱ्या वेळेसह, किती वेळा प्रसारीत करणार त्याचा नेमका प्रसारणाचा तपशील) आणि जाहिरात प्रसारणाच्या खर्चाचा संभाव्य तपशील देणे आवश्यक आहे.
समितीच्या वतीने मुद्रीत माध्यमे,इलेक्ट्रॉनिक माध्यमे तसेच सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवण्यात येत असून त्यावर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले