पुणे : – लोकसभा निवडणुक २०१९ प्रचारासाठी उमेदवार सभा, बैठकी, दौरे, प्रसिद्ध मंडळींची भेट, भाषण देत प्रचार करत आहेत. सध्या सोशल मीडियावर अभिनेता नाना पाटेकर याच्या नावाने अनेक मॅसेज व्हायरल होत आहेत. त्यावर खुद्द नाना पाटेकरांनी यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.
माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून मी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा जाहीर केलेला नाही, असं नानांनी स्पष्ट केले आहे. नानांच्या नावाने व्हायरल होणाऱ्या मॅसेजमध्ये त्यांनी अमूक एका पक्षाला किंवा उमेदवाराला समर्थन दिले आहे, अशा आशयाचा मजकूर आहे. मात्र या फोटोंमागील सत्य नानांनी ट्वीट करत सांगितलं आहे. नाम फाऊंडेशनच्या कामानिमित्त गावोगावी फिरताना अनेक लोक भेटायला येतात आणि पुष्पगुच्छ देऊन फोटो काढतात. काही मंडळी अशा फोटोंचा गैरवापर करीत आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही. कुठल्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, असं स्पष्ट मत नानांनी व्यक्त केले आहे.