.पुणे, दि.30- जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने मोठा उत्सव सुरू झाला आहे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, आदर्श आचार संहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातारणात पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सिटीजन व्हिजिलन्स अंतर्गत ‘सी-व्हिजिल’ हे नवे मोबाईल ॲप विकसित केले आहे. पुणे जिल्ह्यातून या अॅपवर आतापर्यंत 444 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जात आहे. हे सी-व्हिजिल’ ॲप उत्तमरित्या काम करत असून त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाकडून प्रथमच हे नावीन्यपूर्ण अॅप देशातील नागरिकांना उपलबध करुन देण्यात आले आहे. या ‘सी-व्हिजील’ ॲपमध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. या ॲपचा वापर करणाऱ्या नागरिकांकडील मोबाईल हॅण्डसेटचा प्रकार, मोबाईल इंटरनेट सेवेची गती (इंटरनेट स्पीड- उदा. 3जी, 4जी),मोबाईल नेटवर्क पुरवठादार कंपनी,स्थाननिहाय नेटवर्क कव्हरेज आदी घटकांवर इंटरनेट स्पीड अवलंबून असतो. या घटकांमुळे तेथील परिस्थितीनुसार ॲपवर छायाचित्र,चित्रीकरण अपलोड करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत फरक असू शकतो. यामध्ये ॲपचा कोणताही तांत्रिक दोष नाही. याउलट ‘सी-व्हिजील’ ॲपला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे, ही आनंदाची बाब आहे. या तक्रारीवर अवघ्या 100 मिनिटात कार्यवाही होत असल्याने हे ॲप नागरिकांसाठी प्रभावी अस्त्र तर निवडणूक आयोगाचा तिसरा डोळा ठरत आहे. कोणताही नागरिक निवडणुकी दरम्यान होणाऱ्या आदर्श आचार संहिता उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार या ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाईन करू शकतो. ‘सी-व्हिजिल’ हे ॲप निवडणुकांदरम्यान आदर्श आचारसंहिता आणि खर्चाच्या उल्लंघनाची तक्रार करणाऱ्या नागरिकांसाठी एक नावीन्यपूर्ण अस्त्र असून या माध्यमातून नागरिकांनी स्वतंत्र व नि:पक्षपाती निवडणुकांच्या संचालनासाठी सक्रिय आणि जबाबदार भूमिका बजवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.