पुणे दि, १०: – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना दंडाच्या रकमेची पावती मोबाईलवर येते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांना आता चाप बसणार आहे. वाहतूक पोलिसांनी दंडाची रक्कम न भरणाऱ्या चालकांसाठी ‘पी.टी.पी.’ नाकाबंदी मोहीम सुरू केली आहे. त्यात अशाच एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाकडून लष्कर वाहतूक पोलिसांनी चक्क 24 हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला.शहर वाहतूक शाखेकडून पुणे ट्रॅफिक पोलिस (पी.टी.पी.) नाकाबंदी मोहीम सुरू केली
आहे. त्याअंतर्गत चौकांमध्ये नाकाबंदी करून ई-चलन मशिनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्कम तपासली जात आहे. एखाद्या वाहन चालकाने दंडाची रक्कम भरली नसेल तर त्याच्याकडून संपूर्ण दंड वसूल करण्यात येत आहे. लष्कर वाहतूक विभागातील पोलिस हवालदार मार्तंड जगताप यांनी गुरुवारी दुपारी नाकाबंदीत एका फॉर्च्युनर गाडीच्या चालकाला थांबवून माहिती घेतली. त्यावेळी त्या गाडीच्या चालकाने यापूर्वी पुणे-मुंबई एक्सप्रेस-वेवर तब्बल २४ वेळा स्पीड लिमिटचे उल्लंघन केल्याचे समोर आले. त्यापोटी प्रत्येक वेळी एक-एक हजार रुपये असा २४ हजार रुपये दंड आकारण्यात आला होता. परंतु ती रक्कम भरली नव्हती. सध्या वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर सी.सी.टी.व्ही. नियंत्रण कक्षातून नजर ठेवण्यात येत आहे.
काय आहे पीटीपी नाकाबंदी
दंड आकारण्यात आल्यानंतर कित्येक दिवस तो न भरणा करता पुन्हा पुन्हा वाहनचालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. त्याचा दंड तसाच वाढत राहतो. परंतु तो दंड भरत नाही. त्यामुळे दंड पेंडींग राहतो. याची तपासणी करण्यासाठी व वसूली करण्यासाठी पीटीपी नाकाबंदी सुरु करण्यात आली आहे. पीटीपी म्हणजे पुणे ट्रॅफीक पोलीस नाकाबंदी मोहिमेत चौकांमध्ये नाकाबंदी करून ई चलान मशीनवर वाहनचालकांकडील थकीत दंडाची रक्कम तपासली जाते. त्यानंतर त्याने ती रक्कम भरली नसल्यास त्याच्याकडून वसूल केली जाते.