.मुंबई दि ११ :- पुस, ता.अंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्स साठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्यांना व बँकांना 5400 कोटी रूपयांना बुडवणार्या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावुन धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश मा.न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
जगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
सदर जमिनीची खरेदी रजिस्ट्री ऑफीस अंबाजोगाई येथे खरेदी खताच्या आधारे करून तहसिल कार्यालय, अंबाजोगाई येथे फेरफार घेण्यात आलेली आहे. ती जमिन देवस्थानची नाही, या प्रकरणी श्री.चंद्रकांत गिरी व इतरांनी अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये जगमित्र शुगर मिल्सच्या नावाने न्यायालयात डिक्री झालेली आहे. असे असतांना चुकीच्या माहितीवरून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे आपल्या बाजुने आहेत. या प्रकरणी या पूर्वीच आपल्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेल्या असताना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने एकाच प्रकरणामध्ये वारंवार नाव बदलून कोर्टाची दिशाभूल करून, खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतलेले आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी 5400 कोटी रूपयांची शेतकरी व बँकांची फसवणुक केली, या प्रकरणी आपण आवाज उठवल्यामुळेच राजकीय सुडबुध्दीतून त्यांचे जावाई आपल्या विरूध्द न्यायालयात वारंवार तक्रारी करत असल्याचे श्री.मुंडे यांनी म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आपण जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो त्यामुळे जाणीवपूर्वक प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर आपल्या विरुद्ध असे खोटे कारस्थान रचण्यात येते असा आरोप ही मुंडे यांनी केला असून कितीही व्यक्तिगत हल्ले झाले तरी सरकार विरुद्ध आवाज उठवणे थांबवणार नाही आपला लढा सुरूच राहिल असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
बाळू राऊत प्रतिनिधी