मुंबई, दि.११ :- स्वच्छ वारी, स्वस्थ वारी निर्मल वारी, हरित वारी हा उपक्रम अतिशय चांगला असून या उपक्रमामुळे वारीची पवित्रता वाढेल यासाठी शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मंत्रालय समिती कक्षात आयोजित समर्थ भारत अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आळंदी ते देहू-पंढरपूर राष्ट्रीय दिंडी सल्लागार आयोजन समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.
या बैठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, वारीचे ईश्र्वरी कार्य आपल्या हातून घडेल. या वारीच्या अभियानात चांगल्या संकल्पना अंतर्भूत आहेत. त्यातून नवा पायंडा घालून दिला जात आहे. या अभियानात सुमारे 30 ते 35 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील हे क्षण महत्त्वाचे ठरतील. विद्यार्थी वारीच्या परंपरेशी जोडले जाणे त्यांच्यासाठी भाग्याचे ठरेल. विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी वारीतील अनुभव मार्गदर्शक ठरतील. या अभियानात विद्यापीठ आणि विविध संस्थांचा सहभाग हा अभिनंदनीय आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीत विविध संस्थांतर्फे अभियानाचे सादरीकरण करण्यात आले. या अभियानात 22 जून रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 20 हजार विद्यार्थी स्वच्छ वारी, स्वस्थ वारी निर्मल वारी, हरित वारी महासंकल्प शपथ घेणार आणि 20 हजार विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी कडुलिंब वृक्षाची 20 हजार रोपे वितरीत करण्याचा गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहेत.
या बैठकीचे प्रास्ताविक संजय चाकणे यांनी केले तर अभियानाचा हेतू राजेश पांडे यांनी स्पष्ट केला. बैठकीला पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितिन करमळकर, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु मिलींद म्हैसेकर, सोलापूर विद्यापीठाचे उप कुलगुरु एस.आय.पाटील, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, वारकरी संघटनेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.