.पुणे दि. २० :- पालखी मार्गावरील मुक्कामांच्या ठिकाणी उभारण्यात आलेले हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात पडल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पालखी तळावर उभाण्यात आलेल्या सर्व हायमास्ट दिव्यांच्या फाऊंडेशनचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडीट करून घ्यावे, ज्या ठिकाणी फाऊंडेशन कमकुवत असतील त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज दिल्या. या कामात कोणतीही कुचराई झाली अथवा काही दुर्घटना घडल्यास संबंधितांवर गुन्हे नोंद करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामांची आणि मुक्कामांच्या ठिकाणांची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, उपायुक्त (नियोजन) श्री दराडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमर माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील दौंड तालुक्यातील वरवंड येथील पालखी तळाला डॉ. म्हैसेकर यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी पालखी तळावर उभारण्यात आलेले हायमास्ट दिवे वादळी वाऱ्यात कोसळल्याचे विभागीय आयुक्तांच्या निदर्शनास आणले. याची तातडीने दखल घेत, डॉ. म्हैसेकर यांनी घटनास्थळी जावून हायमास्ट दिव्यांच्या फाऊंडेशनची पाहणी केली.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सर्व हायमास्ट दिव्यांच्या फाऊंडेशचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. ही बाब अत्यंत गंभीर असून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. हायमास्ट दिवे योग्य रित्या उभारण्यात याव्यात यासाठी कायमचे उपाय करण्याबरोबर ज्या ठिकाणी पाखली येईपर्यंत यावर काही उपाययोजना करणे शक्य नाही, त्याठिकाणी हायमास्टचे खांब काढून तात्पुरर्त्या स्वरूपात दिव्यांची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. सध्याचा पावसाचा मोसम लक्षात घेता कोणतीही जोखिम न घेता योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
नीरा नरसिंहपूरला दिली भेट…
तीर्थक्षेत्र विकास निधीतून काम सुरू असणाऱ्या नीरा नरसिंहपूर देवस्थानलाही डॉ. म्हैसेकर यांनी आज भेट दिली. त्या ठिकाणी सुरू असणाऱ्या विकास कामांची पाहणी त्यांनी केली, या कामांना गती देवून कामाचा दर्जा चांगला राखण्याविषयी त्यांनी सूचना केल्या.