पुणे दि, २० : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे ते पंढरपूरच्या पालखी मार्गाची पाहणी करून विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सुरु असलेल्या विकासकामे आणि दुरूस्तीच्या कामांचा आढावा घेतला. पालखी मुक्कामांच्या ठिकाणी वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची काळजी घेवून पालखी सोहळ्या पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना आज केल्या.
यावेळी जिल्ह्याच्या हद्दीत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी प्रभाकर गावडे, अप्पर जिल्हाधिकारी रमेश काळे, सातारा जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या सह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील झेंडेवाडी विसावा, सासवड पालखी तळ, बेलसर फाटा, जेजूरी पालखी तळ, सुलकवाडी वेल्हा पालखी तळांची व ठिकाणांची डॉ. म्हैसेकर यांनी पहाणी केली. पालखी मार्गावरील बेलसर फाटा येथे असणाऱ्या वळणावरील धोकादायक खड्याला तातडीने संरक्षक कठडा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सासवड येथील पालखी तळावर पाण्याचा प्रश्न येवू नये यासाठी आवश्यक असणारे पुणे आणि सातारा जिल्ह्यातील वीजेचे फिडर सुरू ठेवण्यासाठी समन्वय ठेवण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी दिल्या. सुकलवाडी जवळील वेल्हाच्या पालखी तळाजवळील रेल्वे ट्रॅकवरील अंडर ग्राऊंड पुलाचे काम पालखी सोहळा मुक्कामाला येई पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पालखी मुक्कामी असताना रेल्वे विभागाशी रेल्वे गाड्यांच्या वेळेविषयी समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या
सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील लोणंद पालखी तळाशेजारी असणाऱ्या नदीलगत करण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला लागून टाकण्यात आलेला नदीतील गाळ समतल पसरून घेवून पालखी तळावर चिखल होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. तरडगाव मुक्कामाच्या ठिकाणी गावालगत असणाऱ्या रस्त्यालगतच्या साईडपट्टया व्यवस्थित भरून घ्याव्यात तसेच रस्त्यावरील तुटलेले दुभाजक पुन्हा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या परिसरातील कॅनॉलला पाणी सोडताना स्थानिक प्रशासनाने जलसंपदा विभागाशी संपर्क व समन्वय ठेवावा, यावर्षी शक्य नसले तरी पालखी तळावर असणारे वीजेच्या खांबांचे आणि तारेचे जाळे कमी करण्यासाठी या परिसरातील वीजतारा भूमीगत करण्याविषयी कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
त्यानंतर डॉ. म्हैसेकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील बरड, नातेपुते, माळशीरज, वेळापूर, भंडीशेगाव या पालखी मुक्कामाच्या ठिकाणांना भेट देवून तेथील स्थितीची आणि सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेतला.
*विभागीय आयुक्तांनी केल्या सूचना…*
▪पालखी तळावर चिखल होणार नाही याची काळजी घ्या.
▪पालखी तळावर टाकण्यात येणारी खडी वारकऱ्यांना टोचणार नाही याची काळजी घ्या.
▪पालखी तळावर हायमास्ट दिव्यांची तपासणी करा, नादुरूस्त दिवे सुरू करा.
▪ प्रत्येक पालखी तळावर वीजेची कनेक्शन उपलब्ध करून द्या.
▪ पालखी तळावर पुरेशा पिण्याच्या पाणी उपलब्ध करा.
▪ पालखी तळावर आणि पालखी सोहळा मार्गावर पुरेसे शौचालये उभारा,
▪ शौचालयांच्या जागा आधीच निवडून ठेवा.
▪शौचालयांची स्वच्छता मॅन्यूअली न करता अधुनिक तंत्रज्ञानाच्या हायस्पीड गनने करा.
▪निवेदेतील संख्येनुसार काम घेतलेल्या कंपन्या शौचालये उभे करतात का याकडे लक्ष द्या.
▪वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्या.