निरा नरसिंहपूर:दि.२० :- शहाजीनगर(ता.इंदापूर) येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अंकिताताई पाटील यांचा पुणे जि. प.च्या सदस्यपदी बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटातून राज्यात सर्वाधिक मताधिक्य्याने निवडून आलेबध्दल शनिवारी (दि.२०) कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.निरा भिमा कारखान्याच्या छावणीस अंकिता पाटील यांनी आज भेट दिली.या भेटीनंतर त्यांचा कारखान्याच्या सभागृहात हा सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना अंकिता पाटील यांनी सांगितले की,पाऊस लांबत चालल्याने राज्यातील साखर कारखानदारीवर संकट निर्माण झाले आहे. तसेच शासनाने साखरेच्या दरात वाढ करणे आवश्यक आहे.
प्रास्ताविक भाषणात कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी सांगितले की,इंडियन शुगर मिल्स असोसिएशन(इस्मा) नवी दिल्लीच्या सदस्या म्हणूनही अंकिता पाटील साखर उद्योगात अभ्यासपूर्ण असे चांगले काम करीत आहेत.यावेळी कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे यांचेही भाषण झाले.
या सत्कार प्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतिलाल झगडे,माजी जि.प.सदस्य श्रीमंत ढोले,तानाजीराव देवकर,दादासाहेब घोगरे,सतीश अनपट,नामदेव किरकत,माणिकराव खाडे,अनिल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
बाळासाहेब सुतार निरा प्रतिनिधी