मुंबई दि ०५ :- नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे.या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.
परंतु नागपंचमी विषयी एक आख्यायिका आहे.
एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.
शेष, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.
श्रावण महिना सुरु होतो तसे श्रावण सरींचे त्याबरोबर आगमन सुध्दा होते. ऊन पावसाचा खेळ सुरू होतो. डोंगर, शेतं शिवार व धरणीमातेवर सगळीकडे हिरवा शालू पसरलेला दिसतो. सगळीकडे वातावरण कसे उल्हासित वाटते. आणि अशातच मन कुठेतरी आठवणींच्या हिंदोळयावरून भरकटत कुमार वयात येऊन भिडते.
आणि इतिहास डोळ्यापुढे फेर धरू लागतो. आषाढात आलेल्या सासुरवाशिणी, मुलीं व महिला श्रावण सुरू होताच रोज संध्याकाळी फेर, पिंगा, फुगडी असे मैदानी खेळ खेळताना दिसु लागायच्या. “पिंगा ग, पोरी पिंगा ग, पोरी पिंगा;तुझ्या पिंग्यान मला बोलिवली, रात जागिवली पोरी पिंगा”…”सर सर गोविंदा येतो मजवर गुलाल फेकितो, या बाई गुलालाचा भार आमुच्या वेण्या झाल्या लाल”…अशा अनेक लोकगीतांच्या ओळी त्यांच्या तोंडून ऐकायला मिळायच्या. तो काळच असा होता. साधारण रात्री आठ वाजले की या सगळ्या मैत्रिणी मोठ्या पटांगणात …
दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.
एक नजर विविध नाग मंदिरावर
*वर्षातून फक्त एकदाच होते 1000 वर्ष जुन्या नागचंद्रेश्वर मूर्तीचे दर्शन*
नागचंद्रेश्वर मंदिरात 11व्या शतकातील अद्भुत मूर्ती आहे. यामध्ये फणा काढलेले नाग देवता असून नागाच्या आसनावर शिव-पार्वती विराजमान आहेत ही मूर्ती नेपाळमधून येथे आणल्याचे सांगण्यात येते. उज्जैन व्यतिरिक्त जगभरात अशी मूर्ती कुठेही नाही.हे मंदिर वर्षातून एकदाच नागपंचमीच्या दिवशी उघडले जाते. मान्यतेनुसार या मंदिरात विराजित नागचंद्रेश्वरचे केवळ दर्शन घेतल्याने कालसर्प दोष आणि दुर्भाग्य दूर होते. याच कारणामुळे प्रत्येक वर्षी नागपंचमीला येथे लाखोंच्या संख्येने भक्त दर्शनासाठी येतात
*सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा या गावी मात्र जिवंत नागाची पूजा केली जाते*
महाराष्ट्रात सर्वत्र मातीचा नाग अथवा नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते पण सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा या गावी मात्र जिवंत नागाची पूजा केली जाते ही परंपरा महायोगी गुरुगोरक्षनाथ महाराजांनी सुरू केली आहे तेंव्हा पासून ही परंपरा चालू आहे. नागपंचमी साठी शिराळा सर्वत्र प्रसिद्ध आहे.
शिराळ्यामध्ये नागपंचमीची तयारी ही एक महिना अगोदरपासूनच सुरू होते…गावकरी आणि आजूबाजूच्या गावातील लोक नाग पकडायला सुरूवात करतात पंचमीला जिवंत नागाची पूजा केली जाते
*अहमदनगर जिल्ह्यातील जामखेडची प्रसिद्ध नागपंचमी*
नर्तिकांच्या नृत्यांच्या डावासाठी प्रसिद्ध असलेल्या या यात्रेचे स्वरूप अलीकडे बदलले असून नागेश्वराची पालखी, कुस्त्यांचा हगामा आणि मनोरंजनाच्या अन्य खेळांनाही आता सुरुवात झाली आहे.जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वराची मोठी यात्रा भरते
नागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर ११४४ मध्ये बांधले गेल्याचा तेथे उल्लेख आहे. त्या काळातील बांधकाम शैलीनुसार केलेले बांधकाम आजही लक्षवेधक ठरते. उत्तरमुखी मंदिरात काळ्या पाषाणाची भव्य पिंड आहे. पिंडीवर भगवान शंकराचा मुखवटा व नागाचा फणा आहे.
*पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर हे ठिकाण जिवंत नागाची केली जाते पूजा*
येथे हातात किंवा आपल्या शरीरावर कुठे ही ठेऊन फोटो काढले जातात
सोमेश्वर देवस्थान हे बारामती तालुक्यात असून ,नीरा व मोरगाव यांच्याजवळ करंजे या गावात वसले आहे.प्रामुख्याने सर्परूपात होणाऱ्या महादेवाच्या दर्शनामुळे हे शिवालय प्रसिद्ध आहे.एके काळी करंजे नावाच्या गावी मालुबाई नावाची सासुरवाशीण घरी राहत होती. महादू गवळीच्या कुटुंबात राहत असलेली मालुबाई मुलबाळ नसल्याने सासू व नणंदेच्या जाचातूनही नित्यनियाने पूजा अर्ध्या करीत असे .एके दिवशी दारात आलेल्या साधूने तिला शिवोपासनेचा मंत्र दिला . त्यानंतर दिवसभराच्या कामातून वेळ नसल्याने ती रात्री बारानंतर वालुकामय लिंग बनवून महादेवाची पूजा करू लागली. बारा वर्षानंतर शंकर भगवान तिला प्रसन्न झाले व तू सौराष्ट्रात येऊन पूजा कर असे तिला स्वप्नात सांगितले मात्र मी संसारी स्त्री आहे मला ते शक्य होणार नाही मग सौराष्ट्रातील महादेवांनी तिला मध्यरात्री सौराष्ट्रात येण्यास विमान पाठिवले व दररोज मध्यरात्री ती सौराष्ट्रात जाऊन पूजा करून परत येऊ लागली.
मात्र एके दिवशी तिच्या पतीला तिच्या शिलाचाच संशय आला त्याने तिला पाठलाग केला व विमानाला पकडून ती कोठे जाते हे पाहण्यासाठी तो सौराष्ट्रात गेला. तिच्यासाठी मंदिराचे दरवाजे उघडले गेले तिचा महादू गायब झाल्याची चर्च्या सुरु झाली व माळुनेच त्याला गायब केलं असा आळ तिच्यावर घेतला गेला .मग महादेवांनी तिच्या स्वनात जाऊन तू सौराष्ट्रात येण्याची गरज नाही मी तुला सर्परूपाने गायीच्या कासेला पिताना दिसेल त्यावेळी तू माझे दर्शन कर असे सांगितले मात्र मालू हे स्वप्न विसरल्याने खोमणे नावाच्या गुराख्याला सर्प दिसला त्याने कुऱहाडीचा घाव घातला.मालूच्या हे लक्षात आले तिने महादेवाची माफी मागितली त्यानंतर महादेवांनी मी लिंगरूपात प्रकट होईल असे स्वप्नात सांगितले, इकडे महादू गवळी परत न आलयाने मालूला जाळण्याची तयारी झाली .मात्र तिने आपले स्वप्न सांगून अखेरची इच्छा म्हणून त्या ठिकाणी खोदणाया सुरवात केली तर तिथेपाण्याची धार लागली व वालुकामय लिंग हि सापडले दरम्यान महादू गवळी पण परत आला व ती सौराष्ट्रात पूजा करणेस गेली होती याबाबत प्रचिती झाली मालू त्याच ठिकाणी गुप्त झाली.म्हणून मंदिरात जाताना प्रथम मालुबाई चे दर्शन घेतले जाते. तसेच जिथे पाण्याची धार निघाली ती विहीर तीर्थाची विहीर म्हणून समजली जाते आजही तेथे खरे खोटे ची शपथ घेतली जाते व खोटे बोलण्याराला चाणाक्ष दिला जातो.तर दर श्रावणात तिसऱ्या सोमवारी निघणाऱ्या पालखी मध्ये कुऱ्हाडीचा वार कारण्याऱ्याला खोमण्याला पहिले सोमनाथाचे दर्शन झालं म्हणून त्याला दर्शनाचा मान पहिला दिला जातो .दर महाशिवरात्रीला व श्रावण महिन्यात तेथे मोठी यात्रा भरते व श्रावण महिन्यात तेथे सर्परूपी महादेव भाविकांना दर्शन देतात.
बाळू राऊत प्रतिनिधी