बोरघर / माणगांव दि, ०४ :- ( विश्वास गायकवाड) दि ०४ ऑगस्ट रोजी संपूर्ण माणगांव तालुक्यात झालेल्या तुफान अतिवृष्टीमुळे तालुक्यातील दोन तरुण निष्पाप नागरिकांना आपला अनमोल जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या दोन्ही मृत व्यक्तिंच्या कुटुंबासह संपूर्ण माणगांव तालुक्यावर दुःखदायक शोककळा पसरली आहे. बाबत सविस्तर वृत्त असे आहे.. माणगांव तालुक्यात गेले दोन ते तीन दिवस संततधार पडणार्या
मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व ठिकाणच्या नदी नाल्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर येऊन संपूर्ण माणगांव तालुका जलमय होवून पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले होते. अशा परिस्थितीत शनिवार दिनांक ०३ ऑगस्ट रोजी माणगांव तालुक्यातील डोंगरोळी बौद्धवाडी येथील रहिवासी श्री.दिपक धर्मा जाधव हे आपल्या गावा लगतची नदी पार करून आपल्या घरी जात असताना नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रविवार दिनांक ०४ रोजी माणगांव शहरातील गणेश नगरचा रहिवासी कुमार नितेश तानाजी शिंदे हा तरुण काही कामा निमित्त शेजारच्या नाणोरे गावात जात असताना बांधार्यावरुन त्याच्या पाय घसरुन तो पाण्याबरोबर वाहत गेला त्याचा मृतदेह सोमवार दिनांक ०५ ऑगस्ट रोजी घटना स्थळापासून काही अंतरावर आढळून आला. तालुक्यातील या दोन्ही उमद्या तरुणांच्या अकाली मृत्यू मुळे त्यांच्या कुटुंबासह संपूर्ण माणगांव तालुक्यावर दुःखदायक शोककळा पसरली आहे. माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक श्री.रामदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्य तत्पर पोलीस हवालदार श्री. स्वप्निल कदम आणि श्री. श्रेयस म्हात्रे यांनी घटना स्थळी जाऊन सदर घटनेचा पंचनामा करून दोघांच्या मृत्यूची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात केली आहे.