मुंबई : दिनांक १९ ऑगस्ट रोजी विद्या प्राधिकरणाने वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या संदर्भामध्ये एक अभ्यास गटाची नियुक्ती केली आहे . प्रत्येक विभागासाठी अभ्यास करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली आहे . या अधिकाऱ्याने त्या विभागातील शिक्षकांचा गेल्या तीन वर्षांतील सरासरी निकालाचा अभ्यास करावयाचा आहे व आपले वस्तुनिष्ठ मत कळवायचे आहे . विद्या प्राधिकरणाच्या या अभ्यासगटालाच शिक्षक भारतीचा जोरदार विरोध आहे . विद्या प्राधिकरण हे अशा प्रकारच्या अटी लादून शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड मिळुच नये यासाठी काम करत आहे. या निर्णयामुळे आदिवासी पाड्यातील, दुर्गम भागातील, झोपडपट्टीतील शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांवर मोठा अन्याय होणार आहे . ज्यांच्या घरात शिक्षणाची कोणतीही परंपरा नाही अशा विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना याचा फटका बसणार आहे. याआधी वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी अथवा निवड श्रेणीसाठी केवळ सेवांतर्गत प्रशिक्षण हीच अट होती . सेवांतर्गत प्रशिक्षणं हे शिक्षकांना अध्यय़न-अध्यापन प्रक्रियेतील नवनवीन प्रवाह, नवीन शैक्षणिक धोरणे, मूल्यमापन पद्धतीतील बदल, अध्यापन व अध्ययना बाबत शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी आहेत. शिक्षकांनी आपल्या विषयांमध्ये अपग्रेड होण्यासाठी ही प्रशिक्षणे आयोजित केली जात होती . या अगोदर शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी विनाअट मिळत होती . केवळ त्यासाठी प्रशिक्षणाची अट होती. निवड श्रेणी ही केवळ वीस टक्के शिक्षकांनाच मिळत होती. ती सरसकट शिक्षकांना मिळावी अशी राज्यातील सर्व शिक्षक संघटनांची मागणी होती . विद्या प्राधिकरणाने वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ हा निकालाशी जोडल्यामुळे शिक्षकांमध्ये संतापाची भावना आहे . शिक्षकांना आपल्या सर्व्हिसमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रमोशन मिळत नाही . सर्व स्टाफ पैकी केवळ एका शिक्षकाला मुख्याध्यापक होता येतं. जर शिक्षकांना सरसकट वरिष्ठ वेतन श्रेणी अथवा निवड श्रेणीचा लाभ दिला नाही तर एका वेतन श्रेणीवर कार्यरत असलेला शिक्षक सेवानिवृत्त होईपर्यंत त्याच वेतन श्रेणीत काम करेल . विद्या प्राधिकरणाच्या या धोरणाला शिक्षक भारती जोरदार विरोध करणार आहे . वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी शिक्षकांना विनाअट मिळायलाच हवी. शिक्षक भारती फक्त निषेध नोंदवून थांबणार नाही , याबाबत विद्या प्राधिकरणाने उचित निर्णय न घेतल्यास शिक्षक भारती आंदोलन करण्यास सिद्ध च असेल! शिक्षणमंत्री संवेदनशील आहेत . तो हा निर्णय मागे घेतील . प्राथमिक ते उच्च माध्यमिक सर्व शिक्षकांना सरसकट वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी देतील हीच अपेक्षा धरू या . अन्यथा मोठ्या आंदोलनाची तयारी करूया . लढेंगे- जितेंगे जालिंदर देवराम सरोदे, प्रमुख कार्यवाह, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य
बाळू राऊत प्रतिनिधी मुंबई