पुणे दि २२ :-अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा राज्यभरातील लाखोंना जीवनदान देणारी ठरली आहे. पूरग्रस्त भागातही या रुग्णवाहिकांमुळे हजारो नागरिकांना मदत झाली आहे. ९३७ रुग्णवाहिकांद्वारे २०१४ पासून जुलै २०१९ पर्यंत ४२ लाख ४४ हजार २२२ रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या सेवेमुळे शक्य झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने २०१४ मध्ये महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीने वैद्यकीय मदत दिली जाते. ही सेवा नागरिकांसाठी मोफत आहे. आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय उपचारासाठी सुरु करण्यात आलेल्या रुग्णवाहिकेत सुमारे ३३ हजार बाळंतपण सुखरुपपणे पार पडले आहेत. गेल्या आठवड्यात सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे या पूरग्रस्त भागात देखील या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून सुमारे हजारो नागरिकांना पूरग्रस्त भागातून रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
२०१४ ते जुलै २०१९ पर्यंत सुमारे 3 लाख 46 हजार रस्ते अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम या रुग्णवाहिकेमुळे शक्य झाले आहे. अपघातानंतर लगेचच आवश्यक ती प्राथमिक उपचार सेवा मिळाल्याने लाखोंचे प्राण वाचले आहेत. आतापर्यंत विविध १३ प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन स्थितीतील रुग्णांना वेळेत उपचार मिळाले आहेत. रस्ता अपघात, नैसर्गिक आपत्ती, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला गोल्डन अवरमध्ये उपचार मिळण्याकरिता अत्याधुनिक रुग्णवाहिकेची ही सेवा सुरु करण्यात आलेली आहे. त्यासाठी १०८ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असून राज्यातील लाखो नागरिकांसाठी हा क्रमांक जीवनदायी ठरला आहे. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत आलेल्या लाखो कॉल्सच्या माध्यमातून रुग्णांना तातडीची वैद्यकीय उपचाराची सुविधा या रुग्णवाहिकेने दिली आहे.
चाकावरचे प्रसूतिगृह
लक्षणीय बाब म्हणजे ही रुग्णवाहिका चाकावरचे प्रसुतीगृहही ठरले आहे. मागील पाच वर्षांत सुमारे ३३ हजार गर्भवतींचे सुखरुप बाळंतपण करण्यात यश मिळाले आहे. या सेवेंतर्गत ९३७ रुग्णवाहिका राज्यात चालविल्या जात आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी राज्यात मुंबईमध्ये बाईक ॲम्बुलन्स सुरु करण्यात आली. त्या माध्यमातून आतापर्यंत २२ हजार रुग्णांना सेवा देण्यात आली आहे. या सेवेचा विस्तार करीत मुंबईमध्ये १८, पालघर, अमरावती येथे प्रत्येकी पाच तर सोलापूर आणि गडचिरोली येथे प्रत्येकी एक अशा एकूण ३० बाईक ॲम्बुलन्स सध्या कार्यरत आहेत.
रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण झाले कमी
महाराष्ट्रासह जगभरात दिवसेंदिवस रस्ते अपघाताची टक्केवारी वाढत आहे. रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यास त्यांना जीवनदान मिळण्याची शक्यता वाढते. हेच आता महाराष्ट्रातही सिद्ध झाले आहे. २०१४ मध्ये ११.४८ (१ लाख लोकसंख्येसाठी) वर असलेले हेच गुणोत्तर २०१६ मध्ये राज्यात १०.०८ इकते खाली आलेले आहे. सरकारी आकडेवारीच्या महिनुसार हे गुणोत्तर कमी झाल्याचे स्पष्ट झालेले आहे.
सन २०१४ पासून आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांची यादी खालील प्रमाणे
अपघात : २२८२२
हल्ला : २९८२
भाजलेले रुग्ण : १३८७
ह्रदयविकार : ८२०
पडणे : ९२४९
विषबाधा : ८३०४८
विजेचा दाब व शॉक : १६२
मोठी दुर्घटना : १२५९
मेडिकल : २०९०७४
इतर : १०३१९७
पॉली ट्रॉमा : ५७८
आत्महत्या / आत्महत्ये पासून होणारी इजा : ३४४