मुंबई, दि. २७ : -राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्यांची कार्यालये, एसटी बसस्थानके, आरटीओ कार्यालये आदी ठिकाणी महिलांसाठी पुरेशी आणि स्वच्छ स्वच्छतागृहे असल्याची खात्री करावी. ज्या ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालये, मुतारी उपलब्ध नाहीत त्याठिकाणी त्यांची तातडीने उपलब्धता करण्यात यावी आणि तशी माहिती सादर करण्यात यावी, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आज संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.
विधानभवनात आज यासंदर्भात उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, परिवहन विभागाचे उपसचिव श्री. साबळे, एसटी महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. कुलकर्णी, कोरो संस्था आणि राईट टू पी चळवळीच्या कार्यकर्त्या मुमताज शेख, सुप्रीया सोनार आदी मान्यवर उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ग्रामविकास विभागाने लोकशाही दिन, ग्रामसभा आदी कार्यक्रमांच्या वेळी महिलांकडून स्वच्छतागृहांबाबतच्या तक्रारी मागवून त्या तक्रारींचे निराकरण करावे. पंचायत समिती, जिल्हा परिषदांची कार्यालये या ठिकाणी लोकांची, महिलांची वर्दळ असते. पण अशा बऱ्याच ठिकाणी शौचालये अस्वच्छ असल्याच्या तक्रारी आहेत. शौचालये फक्त बांधून उपयोग नाही तर त्याची देखभाल, स्वच्छताही राखली जाणे महत्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील बचतगटांच्या महिलांकडून सार्वजनिक शौचालयांच्या स्थितीबाबत सर्व्हेक्षण करुन माहिती घेऊन त्यावर कार्यवाही केली जाईल, असे ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव श्री. गुप्ता यांनी सांगितले. ग्रामपंचायत, पंचायत समित्या,जिल्हा परिषदा आदी ठिकाणी महिलांसाठी स्वतंत्र शौचालये असणे व त्यांची स्वच्छता राखण्याबाबत जिल्हा परिषदांना तातडीने सूचित करु, असे त्यांनी सांगितले. यावेळी एसटी बस स्थानकांवरील शौचालयांच्या स्थितीबीबतही आढावा घेण्यात आला. एसटी बसस्थानकांवर महिलांसाठी शौचालये आणि मुतारींची संख्या वाढविणे गरजेचे आहे. याशिवाय वर्दळीच्या पीकअप शेडच्या ठिकाणीही महिलांसाठी शौचालये आणि मुतारींची उपलब्धता करण्यात यावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी परिवहन विभाग आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. एसटी बसस्थानकांवरील अस्वच्छ शौचालयांविषयी तक्रार करण्यासाठी एखादी हेल्पलाईनही सुरु करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सूचित केले. एसटी महामंडळामार्फत येत्या २ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील १०० बसस्थानकांवरील शौचालये ही आदर्श शौचालये करण्याचे नियोजन आहे. राज्यातील सर्व बसस्थानकांवरील शौचालये ३१ मार्च २०२० पर्यंत आदर्श शौचालयांमध्ये रुपांतरित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती यावेळी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. या योजनेची अंमलबजावणी करताना महिलांसाठी अधिक शौचालये असतील याची खात्री करण्यात यावी, अशा सूचना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.