मुंबई, ०५ : – राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांना एकत्र करून एक शिक्षक परिषद येणाऱ्या काळात निर्माण करणे आवश्यक असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते. प्राथमिक, माध्यमिक आणि विशेष शिक्षक, आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसेच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिकांना राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारे सन २०१८-१९ चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा मुंबईतील रंगशारदा हॉटेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री ॲङआशिष शेलार, आमदार सरदार तारासिंह, आमदार कपिल पाटील, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव सौरभ विजय, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. राज्य शिक्षक पुरस्कारार्थींना एक लाख रुपये, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याच पुरस्कार सोहळ्या दरम्यान डॉ.संजय उपाध्ये यांनी उपस्थितांशी संवाद साधून आपल्या कविता सादर केल्या. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक हे रोल मॉडेल — ॲड. आशिष शेलार ॲड.शेलार यावेळी म्हणाले, येणाऱ्या काळातही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा. शिक्षक दिनीच शिक्षकांचा सन्मान होणे ही बाब महत्त्वाची आहे. कारण विद्यार्थीच नाही तर देशाचे नागरिक घडविण्याचे काम शिक्षक करीत असतात. महाराष्ट्राला उज्ज्वल शिक्षण, उत्कृष्ट शिक्षक आणि शिक्षण सुधारकांची परंपरा आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याची अत्यंत महत्वाची जबाबदारी शिक्षकांवर असते. येणाऱ्या काळातही शिक्षक विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल ठरतील असा विश्वास ॲड. शेलार यांनी यावेळी व्यक्त केला.सन २०१८-१९ च्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावर १०७ शिक्षकांची निवड केलेली असून त्यामध्ये ३७ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १८ आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक शिक्षक, ८ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, २ विशेष शिक्षक (कला/क्रीडा) व १ अपंग शिक्षक/अपंग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक व १ गाईड शिक्षक व १ स्काऊट शिक्षक यांचा समावेश आहे.श्री.तावडे यावेळी म्हणाले, शिक्षक परिषदेच्या माध्यमातून त्यांना येणारे अनुभव, त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न इतर शिक्षकांना समजतील आणि त्याचा फायदा राज्यातील विद्यार्थ्यांना होईल. एक शिक्षक फक्त विद्यार्थी घडवत नाही तर तो समाज आणि राष्ट्र घडवितो. आज आदर्श शिक्षक पुरस्कार ऑनलाईन केल्यामुळे अगदी आदिवासी, गावपाड्यात उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांचाही सन्मान झाला असल्याचे सांगून शिक्षक दिनानिमित्त राज्यातील पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचे अभिनंदन श्री. तावडे यांनी यावेळी केले.
बाळू राऊत प्रतिनिधी