पुणे दि१६ :- पुणे शहरात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आरोपी ला पुणे गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या दांम्पत्याकडून 77 लाख रुपये किंमतीचे दीड किलो ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई चांदणी चौकाजवळील प्रथमेश ईलाईट बिल्डींग जवळील कट्टा हॉटेल समोर करण्यात आली. सेलवम नरेशन देवेंदर (वय -57), वासंती चिनु देवेंदर (वय -57, रा. दोघेही सायन कोळीवाडा, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या दांम्पत्याचे नाव आहे. जप्त करण्यात आलेल्या ब्राऊन शुगरची जागतिक बाजारपेठेत एक कोटी साठ लाख रूपये किंमत आहे. दोघांच्या विरुद्ध अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखा युनिट तीनचे कर्मचारी गस्तीवर असताना, उपनिरीक्षक संजय गायकवाड, किरण अडागळे, कर्मचारी सचिन गायकवाड, प्रविण तापकीर यांना चांदणी चौकाजवळील प्रथमेश ईलाईट बिल्डिंग जवळ कोथरूड कट्टा हॉटेलच्या समोर एक महिला व पुरुष संशयास्पदरित्या फिरत असताना दिसले. त्यांचा संशय आल्यामुळे पोलिसांनी दोघांना हटकले असता दोघेही घाईत निघून जावू लागले. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता सेलवम याच्याकडील पिशवीत 1 किलो तर वासंती हिच्या पिशवीत 540 ग्रॅम असे 1 किलो 540 ग्रॅम ब्राऊन शुगर मिळून आले. त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्राऊन शुगर कोठून आणले, ते शहरात कोणाला देणार होते. याचा तपास पोलिस करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त गुन्हे अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राजेंद्र मोकाशी, सहाय्यक निरीक्षक भालचंद्र ढवळे, कर्मचारी विल्सन डिसोझा, मच्छिंद्र वाळके, राहुल घाडगे यांच्या पथकाने केली.