पुणे दि.०५ :- हवेली तालुक्यातील पेरणे फाटा येथे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमास 1 जानेवारी रोजी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवाव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात मौजे पेरणे (भिमा कोरेगांव) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री.राम यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे उपस्थित होत्या.राम म्हणाले, हा कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच विजयस्तंभ येथे भेट देणाऱ्या नागरिकांची व गावकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी योग्य त्या
उपाययोजना कराव्यात. टँकरव्दारे पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे, फिरते स्वच्छतागृह, ये-जा करण्याकरीता एस.टी. महामंडळ व पी.एम.पी.एम.एल ने पुरेश्या बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, आरोग्य विभागाने रुग्णवाहिका व पुरेसा औषध साठा तयार ठेवावा. बांधकाम विभागाने या ठिकाणचे सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, बांधकाम दुरुस्ती, सी.सी.टी.व्ही कॅमेरे, प्रशस्त वाहन पार्किंग व्यवस्था करावी. विद्युत विभागाने पुरेसा विद्युतपुरवठा करावा. अन्न व औषध विभागाने खाद्य पदार्थांच्या दुकानामध्ये भेसळयुक्त पदार्थांची विक्री होणार नाही याची दक्षता घ्यावी. अग्नीशमनवाहिका तसेच आवश्यक त्या सुविधा वेळेत पुरवण्यासाठी सर्वांनी एकमेकांशी समन्वय ठेवून कार्यवाही करावी. पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात नागरिक उपस्थित राहतात, या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी दक्ष राहून कामे करावीत. या दिवशी कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये, यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी या बैठकीस महसूल, गृह विभागाबरोबरच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, वढू, पेरणे येथील सरपंच तसेच नागरिक उपस्थित होते.