पुणे दि २५ :- महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांची कर्जमाफी घोर फसवणूक करत आहे. त्यासाठी आज भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली राज्यभर लाखो शेतकरी आणि सर्व सामान्य नागरिक रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय भारतीय जनता पक्ष स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला चांगलेच धारेवर धरले.
पाटील म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार हे फसवून सत्तेत आलेलं सरकार आहे. जनादेश नसताना, सत्तेसाठी आकड्यांची जुळवाजुळव करुन अभद्र आघाडी करुन सत्तेत आलं. कर्जमाफीच्या नावाखाली या सरकारने शेतकऱ्यांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा श्री पाटील यांनी दिला.
ते पुढे म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि स्वत:ला राज्याचे जाणते राजे म्हणवून घेणारे शरद पवार यांनी सरकार स्थापन होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, शेतकऱ्यांची दु:खं दूर करू असं आश्वासन दिलं होतं. तसेच, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार मदत देऊ असा शब्द दिला होता. पण सत्तेत आल्यावर त्यांना याचा विसर पडला. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी राष्ट्रपती राजवटीमुळे माननीय देवेंद्र फडणवीस यांचे काळजीवाहू सरकार अस्तित्वात होते. त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून दिली. पण महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर माननीय उद्धवजी आणि शरद पवारांनी केलल्या हेक्टरी २५ हजार नुकसानभरपाईच्या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले. अन् जनतेला ही याचा विसर पडावा म्हणून सरसकट कर्जमाफीऐवजी दोन लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली. त्यातही २०१५ नंतर ते २०१९ पर्यंत कर्जमाफ केली. पण २०१९-२०२० मधील कर्जमाफीचे काय झालं असा सवाल ही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना श्री. पाटील म्हणाले की, माननीय उद्धव ठाकरे यांना हेक्टरी, गुंठेवारी यातील फरक देखील कळत नाही आहे. त्यांना केवळ मुंबईतील जमीनीच्या किमती कळतात. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यातील फरक समजून घ्यावा, असा टोला ही श्री पाटील यांनी यावेळी लगावला.
महाविकास आघाडीवर बोलताना श्री पाटील म्हणाले की, सध्या हे सरकार शरद पवारांच्या रिमोट कंट्रोलने चालतं. पवार साहेबांचा प्रत्येक शब्द माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मानना लगेच समजतो. त्यामुळे ते त्यांना हवं तसंच काम करतात. त्यांना राज्यातील जनतेच्या प्रश्नांचं देणंघेणं नाही. शेतकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार यावर त्यांनी मौन बाळगले आहे.
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, गिरीश महाजन, विनोद तावडे, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत, प्रवीण पोटे, संजय कुटे, मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.