टेंभुर्णी दि ०४ :- प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशभरात व राज्यात संचार बंदी आदेश लागू केलेला असून याचे अधिक तंतोतंत पालन व्हावे यासाठी पोलिस अधिक्षक मनोज पाटील व करमाळा उपविभागिय ङाँ विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी सायंकाळी ५ वा.टेंभुर्णी व मोडनिंब येथे पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च करण्यात आले.
टेंभुर्णी पोलीस ठाणे येथून रूट मार्च सुरू करण्यात आला.येथून वडार गल्ली,मेन रोड,टिळक रोड,जुनी वेश,पुढे महामार्गावरून करमाळा चौक,अकलूज चौक येथून परत पोलीस ठाणे येथे रूट मार्च विसर्जित करण्यात आला.तसेच नंतर मोडनिंब येथे उड्डाण पूल येथून सुरुवात करून संपूर्ण मोडनिंब गावातून रूट मार्च काढण्यात आला.यावेळी नागरिकांना कोरोना व्हायरस विषयी स्पीकरवरून माहिती देऊन घरातून बाहेर न पडण्याच्या तसेच नियमाचे पालन करण्याच्या सक्त सूचना ही देण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनीही सर्व पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी यांना कामात कुचराई न करता सर्वांनी आपली सेवा इमाने इतबारे पार पाडावी असे आवाहन सुरुवातीस केले.तसेच नागरिकांनी वारंवार रस्त्यावर न येता घरात बसून पोलिसांना सहकार्य करावे अन्यथा कठोर पोलीस कारवाईस सामोरे जावे लागेल.पोलिसांवर दंडुक्याचा वापर करण्याची वेळ येऊ नये असा इशारा दिला आहे.
या रूट मार्चमध्ये सपोनि राजेंद्र मगदूम,सपोनि एस.बी.भोसले,पोसीई एस.बी.पाटील,पोसीई वाघमारे यांच्यासह ३५ पोलीस कर्मचारी,महिला पोलीस कर्मचारी,२६ होमगार्ड सामील झाले होते.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप