पुणे,दि.१९: पुण्यातील कोरोनाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली.बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, ससून हॉस्पिटल चे समन्वयक राजेंद्र गोळे यांच्यासह महसूल,आरोग्य विभाग, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत डॉ. म्हैसेकर म्हणाले, विभागात पुणे जिल्ह्यातील वाढती रुग्ण संख्या ही चिंतेची बाब आहे. रुग्णांच्या संख्येत घट होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत. कोरोना पोसिटिव्ह रुग्ण आढळलेल्या जास्त घनसंख्या असणाऱ्या भागात लॉक डाऊन ची कडकपणे अंमलबजावणी करावी. ऊसतोड मजुरांना पर जिल्ह्यात पाठवण्यापूर्वी त्यांची योग्य ती वैद्यकीय तपासणी करवून घेऊनच पुढील कार्यवाही करावी.यावेळी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील आजवरच्या कोरोना रुग्णांची पार्श्वभूमी, त्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधा, पीपीई किट, मास्क, औषध साठा, ससून रुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय साधनसामुग्री, कामगारांचे निवारा कॅम्प व त्यांची भोजन व्यवस्था, रेशन धान्य वितरण, अत्यावश्यक सेवा सुविधांमधील व्यक्तींना देण्यात येणारे पासेस आदी विविध बाबींचा आढावा घेतला.