बारामती दि.19: – कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी राबविण्यात “बारामती पॅटर्न”ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. याबाबतच्या बारामती येथे प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, नगरसेवक किरण गुजर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी योगेश कडूसकर, पोलीस उपअधीक्षक नारायण शिरगावकर, गट विकास अधिकारी राहूल काळभोर, सिल्व्हर ज्युबिली शासकीय ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद काळे, रुई ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल दराडे उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती येथील जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत तसेच ज्या ठिकाणी कोरोना बाधितांची साखळी निर्माण होणार नाही अशा ठिकाणचे व्यवहार सोशल डिस्टंनसिंग राखून सुरु करण्याबाबतच्या नियोजनाबाबत चर्चा केली. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्ष, बेड तसेच व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक सामुग्रीच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे. शासकीय योजनांचा लाभ सर्वच लाभार्थ्यांना मिळेल, यादृष्टीने काळजी घेण्यात यावी, अशा प्रकारच्या सूचना केल्या. त्याचप्रमाणे बारामतीमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यात येत असल्याने कोणीही घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करणे अनिवार्य असल्याचे सांगून याबाबत सर्वच नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. शिवभोजन थाळीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार यात वाढ करण्याच्या सूचना केल्या. परराज्यातील कामगारांच्या निवास आणि भोजनाचा आणि स्वस्त धान्य पुरवठ्याचा आढावा घेऊन सूचना केल्या. त्याचबरोबर सर्वच खाजगी डॉक्टरांनी दवाखाने उघडे ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी जनाई उपसा जलसिंचन तसेच शेतीविषयक अडचणींविषयी या बैठकीत सूचना केल्या.