टेंभुर्णी [प्रतिनिधी ]- नवजात मृत स्त्री अर्भकाची माहिती लपवून त्याची विल्हेवाट लावल्या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी पोलीस सुत्राच्या माहितीनुसार अवघ्या काही तासात मृत अर्भकाच्या माता-पित्याना ताब्यात घेऊन अटक केली.यामुळे पोलिसांचे अभिनंदन करण्यात येत आहे.ही घटना २४ एप्रिल रोजी सकाळी ८.४० वा. उघडकीस आली.याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,दि.२४ एप्रिल रोजी सकाळी ८.४० वा. टेंभुर्णी पोलिसांना माहिती मिळाली की,माढा तालुक्यातील निमगाव (टें) येथे मृत स्त्री जातीचे अर्भक बेवारस अवस्थेत मिळून आले आहे अशी माहिती गाव पोलीस पाटील रसिका उमाकांत लोंढे यांनी दिली.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी सपोनि राजेंद्र मगदूम हे महिला पोकॉ भांगे यांच्यासह फौजफाटा घेऊन घटना स्थळी हजर झाले.तोपर्यंत निघताना सपोनि राजेंद्र मगदूम यांनी अर्भकाच्या तपासासाठी गुप्त यंत्रणा कामास लावली होती.घटनास्थळी दहिवली-निमगाव (टें) रस्त्यावर रोहिदास नावडकर यांच्या वस्तीजवळ रस्त्याच्या कडेला स्त्री जातीचे नवजात अर्भक पडलेले होते.तसेच त्यास मृत होऊन काही दिवस झाल्याने ते फुगलेले होते.पोलिसांनी सोपस्कर करून अर्भक ताब्यात घेतले.एवढ्यात पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाली की,या परिसरात काही अंतरावर बाहेर गावची दगड फोडणारी माणसे राहत असून त्यांच्यापैकी एक महिला गरोदर होती.या माहितीनुसार पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तेथील एक महिला लक्ष्मी शंकर शिंदे (वय-३०) ही प्रसूत झाल्याची माहिती मिळाली.त्यास विश्वासात घेऊन माहिती घेतली असता तिने सांगितले की,ती गरोदर होती,मंगळवारी दुपारी ०२ वा. तिच्या पोटात दुखू लागले यामुळे ती निमगाव (टें) येथे गेली होती.मात्र तेथील सिस्टरने तिला येथे उपचार होत नसल्याने मोठया दवाखान्यात जाण्यास सांगितले.यामुळे ती पायी चालत परत येत असताना पोटात जास्त दुखू लागल्याने ती नावडकर वस्तीजवळ रस्त्याकडेला बसली.तेथेच तिने मुलीस जन्म दिला.मात्र ती मुलगी जन्मानंतर रडली नाही व हालचाल केली नाही.यामुळे तिने मयत समजून मुलीस खड्डा करून तेथे पुरले.नंतर झोपडीवर गेल्यावर पती शंकर नागू शिंदे यास माहिती दिली.यामुळे पोलिसांनी नवजात स्त्री अर्भकाची विल्हेवाट लावल्याची खात्री झाल्याने लक्ष्मी शंकर शिंदे (वय-३०) व तिचा पती शंकर नागु शिंदे (वय-४२) दोघे रा.मांडवी,ता.किनवट.जि.नांदेड यांना गुन्हा दाखल करून अटक केली.तसेच अर्भक शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून या घटनेचा पुढील तपास सपोनि राजेंद्र मगदूम हे करीत आहेत.
टेंभुर्णी, प्रतिनिधी :- अनिल जगताप