पुणे,दि.१६ – राज्यातील सर्व जनतेला आरोग्य सुविधा परवडणा-या दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी फीलीप्स हेल्थकेअर इन्नोव्हेशन सेंटरची मदत घेऊ,असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चाकण एमआयडीसी येथे फीलीप्स इंडिया कंपनीच्या उत्पादन तसेच संशोधन व विकास प्रकल्पाचे (हेल्थ केअर इन्नोव्हेशन सेंटरचे)उद्घाटन करतांना ते बोलत होते.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार महेश लांडगे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बल्गन, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, फ्रॅन्स वॅन होटेन, अभिजीत भट्टाचार्य, सोफीया बिचू, डॅनियल मेझॉन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले, राज्यातील तसेच देशातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरु केली. राज्यात महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना आरोग्य सुविधेचा लाभ होत आहे. देशातील ९० टक्कयांहून अधिक कुटुंबे या योजनेशी जोडली गेली आहेत. आतापर्यंत 1.5 दशलक्ष लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
अन्न व आरोग्य सेवा या दोन क्षेत्रांमध्ये उद्योगवाढीसाठी मोठी संधी असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे उद्योग सुरु करणा-या उद्योगांना सर्वतोपरी मदत करु, असे सांगितले. गेल्या 5 वर्षात कॅथलॅबची संख्या 250 वरुन 650 वर गेली असल्याचे लक्षात आणून देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कॅथलॅब, सिटीस्कॅन, अल्ट्रासाऊंड या साधनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. आरोग्यविषयक जागृती होत असल्यामुळे या साधनांच्या वापरामध्येही वाढ होत आहे. मध्यमवर्गीय तसेच उच्च मध्यमवर्गीय जनतेत आरोग्यसेवांवर खर्च करण्याचे प्रमाणही वाढत आहे. आरोग्य क्षेत्र हे नफा कमावण्याचे क्षेत्र नाही, तथापि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसुविधा परवडणा-या दरात मिळण्यासाठी फीलीप्सच्या उत्पादनांची मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
फीलीप्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रॅन्स वॅन होटेन यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आरोग्य आणि संपत्ती या दोन महत्त्वाच्या गोष्टी असून सर्वांसाठी आरोग्य ही संकल्पना प्रत्यक्ष अंमलात आणण्याचे आमचे प्रयत्न आहे. या प्रयत्नांना सरकारची मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसेच हेल्थकेअर इन्नोव्हेशन सेंटरची माहिती दिली. कार्यक्रमास फीलीप्सचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.