पुणे दि २९ :-दिवाळीच्या सुट्टीत नागरिकांनी सर्व हॉटेल आणि पर्यटनस्थळे सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर एमटीडीसीने “स्वच्छता हीच सेवा” हे ब्रीद घेेेऊन पर्यटन स्थळांची स्वच्छता सुरू केली आहे. निवस्थानातील किरकोळ दुरुस्ती, निर्जंतुकीकरण अशी सर्व कामे करण्यात आली आहेत. पर्यटकांची मागील प्रवासाची माहिती, शारीरिक तापमान, निवासस्थानाचे निर्जंतुकीकरण आशा सर्वप्रकारची काळजी घेऊन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) निवासस्थाने सुसज्ज करण्यात आली आहे.दिवाळीच्या सुट्टीत नागरिकांनी पर्यटनाला बाहेर पडावे, असे आवाहन एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.पुढील वर्षभर निवासस्थानांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटायझर स्प्रे, ऑक्सिमिटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याच बरोबर सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पर्यटन विषयक सुविधा, खाद्यपदार्थ, पर्यटन स्थळांच्या आजूबाजूची ठिकाणे, नैसर्गिक ठिकाणांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. पर्यटनस्थळी घ्यावी लागणारी सुरक्षेची काळजी, सुरक्षेच्या उपाययोजना याची माहिती एमटीडीसीचे संकेतस्थळ आणि पर्यटकांच्या मोबाईलवर पाठविण्यात येईल.पुणे विभागातील पानशेत, कार्ला, माथेरान आणि माळशेज घाट ही पर्यटन निवास स्थाने या पूर्वीच सुरू करण्यात आली असून, महाबळेश्वर आणि भीमाशंकर पर्यटक निवास २४ ऑक्टोबरला सुरू झाली आहेत. पर्यटकांचा जास्त ओढा महाबळेश्वरकडे आहे.पर्यटक निवासात आलेल्या पर्यटकांचे स्वागत करुन त्यांना सॅनिटायझर वापरण्यास विनंती करण्यात येईल. त्यानंतर पर्यटकांचे शरीराचे तापमान आणि ऑक्सिजन पातळीची नोंद घेतली जाईल. पर्यटकांची मागील प्रवासाची माहिती घेवुन त्यांची नोंद ठेवली जाईल. पर्यटकांच्या समोर त्यांना देण्यात येणाऱ्या सुटचे सॅनिटायझेशन केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत आहे. पर्यटकांनी निसर्गाचे भान ठेवुन पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे करण्यात आले आहे.