पुणे ग्रामीण दि २६ : – पुणे कोरेगाव भीमा सह पेरणे येथे दि. १ जानेवारी २०२१ रोजी अभिवादन कार्यक्रम या वर्षी प्रतीकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. तसेच बाहेरील येणाऱ्या नागरिकांना कोरेगाव भीमा परिसरातील 16 गावांमध्ये येण्यास बुधवार (दि. 30) ते दि. 2 जानेवारी 2021 रोजी सकाळी सहावाजेपर्यंत बंदी घालण्यात आली असून कलम 144 जमावबंदीचे आदेशही लागू करण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले आहे.कोरेगाव भीमा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम संदर्भात शिक्रापूर (ता. शिरूर) येथे घेतल्या बैठकीत अधीक्षक डॉ. देशमुख बोलत होते. यावेळी अपर अधीक्षक मिलिंद देशमुख, दौंड उपविभागीय अधिकारी राहुल धस, शिक्रापूरचे निरीक्षक उमेश तावसकर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी दरवर्षी लाखो अनुयायी येत असतात, मात्र, या वर्षीचा हा कार्यक्रम प्रतीकात्मक आणि साध्या पद्धतीने साजरा व्हावा यासाठी शासनाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार कार्यक्रमासाठी या परिसरात बाहेरून कोणतीही व्यक्ती येणार नाही, यासाठी स्थानिक प्रशासनाने निर्बंध घालावे, असे सांगण्यात आले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 144 देखील लागू केले आहे.
सोशल मीडियावर चुकीची माहिती अथवा अफवा पसरविणाऱ्यांवर प्रतिबंध करण्यात आला आहे. परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम, सभा यांसह परिसरात होर्डिंग लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कामाला जाणाऱ्या व्यक्तींना कामावर जाता येणार असून त्यांनी ओळखपत्र ठेवणे बंधनकारक आहे. तसेच विजयस्तंभ परिसरातील 16 गावांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले असून तेथील स्थानिक व्यवहार सुरू ठेवण्यात येणार असून स्थानिकांनी पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे.पुणे ग्रामीण
पोलीस ठाणे: गावांमध्ये बंदी
शिक्रापूर : कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, वाजेवाडी, पिंपळे जगताप, आपटी, वाडेगाव.
लोणीकंद : लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी, वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव.
पास असणाऱ्या मोजक्या मंडळींनाच प्रवेश
प्रतीकात्मक स्वरूपात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी मोजक्याच मंडळींना प्रवेश देण्यात येणार असून त्यांना पोलिसांकडून पास देण्यात येणार आहे. हे पास लोणीकंद, शिक्रापूर पोलीस ठाणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय येथून देण्यात येणार आहेत, त्यानुसार पास असणाऱ्या मोजक्या व्यक्ती वगळता इतर कोणासही या परिसरात येण्यास बंदी आहे. पेरणे येथे होणारा अभिवादन कार्यक्रम सर्व अनुयायांसह नागरिकांना घरात बसून पाहता यावा यासाठी दूरदर्शन आणि इतर प्रसार माध्यमातून सोय उपलब्ध केली जाणार आहे, त्यामुळे सर्व अनुयायांनी हा कार्यक्रम घरात बसून पाहावा, असे आवाहन डॉ. अभिनव देशमुख यांनी केले आहे.