पुणे दि१३ : – पुण्यातून मंगळवारी पहाटे 56 लाख डोस देशभर लस रवाना करण्यात आला. एअरइंडिया, स्पाईस जेट, गो एअर आणि इंडिगोच्या विमानांनी 56 लाख डोस पाठवण्यात आले. यामुळे पुणे शहराने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे.स्पाईस जेटच्या विमानाने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचे एक हजार 88 किलोचे 34 बॉक्स दिल्लीला पाठवण्यात पाठवण्यात आले. सकाळी हे विमान आठ वाजता झेपावल्यानंतर थोड्याच वेळात स्पाईस जेटचे विमान पुण्यातून चेन्नईकडे झेपावले.आज एअरइंडिया, स्पाईस जेट, गो एअर आणि इंडिगोच्या विमानातून 56 लाख 50 हजार डोस दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलॉंग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरू, लखनौ आणि चंदिगढला पाठवण्यात आले, अशी माहिती नागरी विमान उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली.लसीचे अनेक साठे हे नियमित विमानांद्वारे ड्राय आईसमध्ये पॅक करून पाठवण्यात येणार आहेत. त्याबाबत नागरी उड्डाण संचनालयाने गेल्या आठवड्यात आचारसंहिता आखून दिली आहे. विजयवाडा, शिलॉंग सारख्या ठिकाणी जेथे प्रवासी विमाने जात नाहीत तेथे मालवाहू विमानांतून लस पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधून लस भरलेले तीन वातानुकुलीत ट्रक पहाटे पाचच्या सुमारास रवाना झाले. त्यातील साठा स्पाईस जेटच्या विमानाने पाठवण्यात आला. ”सुमारे 700 किलो वजनाचे दोन लाख 76 हजार डोस घेऊन पुण्याहून अहमदाबादला नेत एअर इंडियाने देशभर राबवण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे, असे ट्विट एअर इंडियाने केले आहे.
कोविशिल्ड लसीचे एक कोटी 10 लाख डोस पुरवण्याचा करार केंद्र सरकारने सीरमसोबत सोमवारी केला. करोना प्रतिबंधक देशव्यापी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी आणि करोना योध्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यार येईल. सुमारे तीन कोटी जणांचे लसीकरण करण्यात येईल. देशभरातील दिल्लीशिवाय प्रमुख 12 शहरात विमानाने याची वाहतूक करण्यात येईल.
येत्या तीन महिन्यात लसीकरण मोहिमेसाठी 70 लाख आरोग्य कर्मचारी कार्यरत असतील, असे या लसीकरण मोहीमेचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.
भारताच्या करोना प्रतिबंधक लसीच्या साठ्याची वाहतूक करण्याचा पहिला मान स्पाईस जेटला मिळाला, हे सांगण्यास मला आनंद होत आहे. स्पाईस जेटच्या विमानाने 34 बॉक्समधील एक हजार 88 किलो वजनाची कोविशिल्ड लस पुण्यातून दिल्लीला नेण्यात आली. आम्ही भारतातील गुवाहाटी, कोलकाता, हैदराबाद, भुवनेश्वर, बंगळुरू, पाटणा आणि विजयवाड्यासह वेगवेगळ्या शहरांमध्ये कोविशिल्डची वाहतूक करणार आहोत.
– अजय सिंग
(चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक, स्पाईस जेट)