पुणे दि २४ :-राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा विभागांमध्ये विविध 20 ठिकाणी पर्यटन महोत्सवांचे आयोजन करण्यात येणार ह. पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांत हे महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.
सदरच्या महोत्सवाअंतर्गत पुणे जिल्हयामध्ये जुन्नरमध्ये द्राक्ष महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जुन्नर पर्यटन विकास संस्था, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, ग्रामविकास आणि स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने सदर महोत्सव दि. 19, 20 व 21 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आले सदर महोत्सवास पर्यटकांचा मोठा प्रतिसादही लाभला. सदर महोत्सवात द्राक्ष बाग भेट, जुन्नर हेरिटेज वॉक, वायनरी भेट, पक्षी निरीक्षण उपक्रम, देवराई भेट, नाणेघाट सहल, बोटिंग, ओझर गणपती दर्शन, गीब्सन स्मारक भेट, लेण्याद्री गणपती दर्शन, ताम्हणे संग्रहालय भेट, अंबा अंबिका लेणी समूह भेट, जुन्नर आठवडे बाजार भेट, कॅम्प फायर व मनोरंजनात्मक कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला होता.
त्याचप्रमाणे सातारा जिल्हयामध्ये वाई महोत्सव आणि कोल्हापूर जिल्हयामध्ये पन्हाळा महोत्सव आयोजित करण्यात येणार होता. सदर महोत्सव नगरपालिकेच्या साहाय्याने दि.26,27,28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत 3 दिवसीय सांस्कृतिक, खादय महोत्सव, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन, बचत गट स्टॉल, लोकसंगीत, पोवाडे, लावणी कार्यक्रम, सायकल/मॅरेथॉन स्पर्धा, मर्दानी खेळ कार्याक्रम, भव्य चित्रकला/वत्कृत्व स्पर्धा, अंध मुलांचा कार्यक्रम, पन्हाळागड दिवे/मशालींच्या प्रकाशात पाहणे, छावा: छ. संभाजीराजे यांचेवर नाटक, चला हवा येऊ दया अथवा तत्सम सिनेतारका मनोरंजन कार्यक्रम यांचा समावेश करण्यात आला होता. मुख्य आकर्षणामध्ये कोल्हापूरी मिसळ व तांबडा- पांढरा रस्सा यांचा आस्वाद असा हा महोत्सव होता. *तथापि, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सदरचे वाई महोत्सव आणि पन्हाळा महोत्सव पुढे ढकलण्यात आले आहेत.*
वाढत्या कोरोनामुळे पर्यटनाचा खोळंबा नाही.
*‘एमटीडीसीच्या पुणे विभागातील सर्व रिसॉर्टमध्ये पर्यटकांसमोरच खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून दिले जाते. पर्यटकांच्या प्रवासाचा इतिहास, वैदयकीय पार्श्वभूमी जाणून घेतली जाते.तपासण्या केल्या जातात. कर्मचाऱ्यांचीही नियमित कोरोना चाचणी केली जाते. त्यामुळे पर्यटकांना विश्वास वाटतो. पुणे विभागात महाबळेश्वर, माळशेजघाट, माथेरान, पानशेत, कार्ला कोयनानगर या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये 90 टक्के बुकिंग होत आहे, तर भीमाशंकरमधील रिसॉर्टचे बुकिंग 60-70 टक्के आहे. सिंहगड आणि अक्कालकोट या ठिकाणी दोन नवे रिसॉर्ट सुरू होत आहेत.*
-दीपक हरणे,प्रादेशिक व्यवस्थापक, पुणे विभाग, एमटीडीसी.
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या संसर्गाला सुरूवात झाल्यानंतर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत पर्यटन पूर्ण ठप्प होते. ऑक्टोबरपासून रूग्णसंख्या आटोक्यात येउ लागली आणि पर्यटनाला चालना मिळू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा रूग्णसंख्या वाढू लागली असली तरी अजून तरी लोकांच्या प्रवासाच्या इच्छांवर परिणाम झालेला नाही. सहलींचे, निवासांचे बुकिंग रद्द होण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे सांगतले जात आहे.
सलग 11 महिने घरी बसून कंटाळलेले नागरिक दिवाळीनंतर पर्यटनासाठी घराबाहेर पडत आहेत. विशेषत: कोकण किनारपट्टीत तसेच महाबळेश्वर, माथेरानसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होउ लागली आहे. सध्याच्या कोरोनावाढीच्या पार्श्वभूमीवर अजून तरी प्रशासनाने रात्री संचारबंदी लागु केली आहे. तथापि, बुकिंग रद्द होणे किंवा ॲडव्हान्स बुकिंगवर परिणाम झालेला नाही.
बऱ्याच ठिकाणच्या सीमा अद्याप खुल्या झालेल्या नसल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे प्रमाण कमी आहे. कोरोनाचा संसर्ग संपलेला नसल्याची जाणीव ठेवून प्रवासात सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचा दावा प्रवासी संस्थांकडून केला जात आहे.
पर्यटनाचा आनंद घेत काम करता यावे, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनस्थळांवरील रिसॉर्टमध्ये मोफत वायफाय सुविधा दिली आहे. त्यानुसार ‘वर्क फ्रॉम होम‘च्या धर्तीवर ‘वर्क फ्रॉम नेचर‘ अशी संकल्पना राबविण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने राज्याभरातील एमटीडीसीच्या सर्व रिसॉर्टवर ही सुविधा देणार असल्याचे एमटीडीसीकडून सांगण्यात आले.
तथापि, प्रशासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करुन पर्यटकांना पर्यटनाचा आनंद महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये घेता येणार आहे. *महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी कोरोना बाबत योग्य ती खबरदारी घेवुन पर्यटन महोत्सवाचा आनंद पर्यटकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे.