पुणे, दि.२४: पुणे शहरात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने ४२ ठिकाणी नाकाबंदी केली आहे. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर दिवसभर विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई सुरु आहे.शहरात २२ ते २८ फेब्रुवारी पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवेतील नागरिक व कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. संचारबंदीच्या काळात या ४२ नाकाबंदीच्या ठिकाणावर रस्त्यावरुन फिरणाऱ्या वाहनचालकांची तपासणी करण्यात येत आहे. उशिरापर्यंत फिरण्याचे कारण जाणून घेतले जात आहे. कोणत्याही कारणाशिवाय फिरणार्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विनामास्क फिरणार्यांवर कडक कारवाईचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत.