मुंबई दि २८ :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आरोपी मंत्री संजय राठोड यांनी आज दुपारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. महाराष्ट्रातील जनतेचा आणि प्रसार माध्यमांचा दबाव आणि भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे संजय राठोड यांनी राजीनामा जरी दिला असला तरीही हे प्रकरण अजून संपलेले नाही. जेव्हा पूजा चव्हाणला न्याय मिळेल, तेव्हाच सत्याचा विजय होईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांची सोमवारी मंत्रिमंडळातून हकालपट्टी न केल्यास सोमवारपासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप सभागृहाचे कामकाज करू देणार नाही, असा इशारा पाटील यांनी शनिवारी दिला होता.
आज संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी राठोड यांना बरखास्त केले, मात्र महिलांच्या सुरक्षेचा हा लढा अजून बाकी असल्याचे नमूद केले. तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत असाच निर्णय घेतला पाहिजे, असे पाटील म्हणाले.
श्री. पाटील पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेच्या निरंतर दबावामुळेच तसेच चित्रा वाघ आणि उमा खापरे यांच्या नेतृत्वात भाजपाच्या कार्यकर्त्यांमुळे मुख्यमंत्र्यांना अखेर हा निर्णय घ्यावा लागला. या प्रकरणात पोलिसांनी आतापासूनच स्वतंत्र व निष्पक्ष पद्धतीने काम करावे आणि पूजा चव्हाण हिला न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ही चौकशी चुकीच्या पद्धतीने केली जात होती. पोलिसांनीही काही लोकांच्या दबावाखाली येऊन केवळ आरोपी मंत्र्याला वाचविण्यात रस दाखवला होता, असे मत विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहांमधील भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत व्यक्त केले.