श्रीगोंदा दि ०२ :- कर्जत पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस,अपघात झालेल्या बऱ्याच वर्षांपासून पडून असलेल्या अशा एकूण १५ दुचाकी/तीनचाकी गाड्या एकूण अंदाजे ३०८००० रुपये किमतीच्या असलेल्या त्यांचे मूळ मालकांचा १५ दिवसात शोध घेऊन त्यांचे समक्ष ताब्यात देण्यात आल्या आहेत.विविध गुन्ह्यामध्ये ताब्यात घेतलेल्या दुचाकीसह इतर वाहने खूप वर्षांपासून लावून ठेवलेली होती. यातील अनेक वाहनधारकांनी वाहन ताब्यात घेण्याबाबत अनास्था दाखवली आहे. त्यात अपघातासह गुन्ह्यातील वाहन घरी नको या मानसिकतेमुळेही वाहने पडून आहेत. पण यामुळे पोलीस ठाण्यात बकालवस्था आली होती. शिवाय या वाहनांची गणना, सुरक्षेचाही ताण वाढत आहे.
कर्जत पोलीस ठाण्यांचे सुशोभिकरणासह इतर उपक्रम राबविण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्र शेखर यादव यांनी बेवारस असलेली व ठाण्यात पडून असलेली वाहने मूळ मालकांना परत दिली.
गाडया ताब्यात मिळालेनंतर गाडी मालक यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी कर्जत पोलिसांचे आभार मानले.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस जवान उदय सगळगीळे, वैभव खिळे यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे