श्रीगोंदा दि.२० श्रीगोंदा तालुक्यात महसूल विभाग मार्फत तहसिल कार्यालय, श्रीगोंदा वतीने सर्वसामान्य जनता,शेतकरी यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात महसूल विजय सप्तपदी अभियानाला सुरुवात झाली आहे.देऊळगाव-भानगांव येथील शिवरस्ता खुला करण्यात आला असल्याची माहिती तहसिलदार प्रदीप कुमार पवार यांनी दिली आहे.तसेच उर्वरीत 6 शिवरस्ते देखील लोकसहभागातून व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून खुले करून देण्याबाबत योग्य नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती देखील दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले यांचे मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.१९मार्च २०२१ ते बुधवार दि.३१ मार्च २०२१ पर्यंत महसूल विजय सप्तपदी अभियान राबविण्यात येणार आहे.
सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या विविध दैनंदिन प्रश्नांसंदर्भात त्वरीत निकाली काढण्यासंदर्भात राज्यात त्याच बरोबर अहमदनगर जिल्ह्यात महाराजस्व अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.या अभियानात शेतकरी खातेदारांच्या व जनतेच्या अत्यंत निकडीच्या व जिव्हाळ्याच्या बाबींमध्ये विशेषत्वाने व पुढाकाराने कामकाज होणार आहे.
श्रीगोंदा तालुक्यात एकूण मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ चे कलम ५(२) अन्वये प्रलंबित असलेले एकूण ५६ दाव्यांमध्ये प्रत्यक्ष स्थळनिरीक्षण करून नोटीस बजावणी केली आहे. ४९ प्रकरणांमध्ये वादी प्रतिवादी यांचे समक्ष स्थळनिरीक्षण करणेत आलेले आहेत. प्रत्यक्ष स्थळ निरीक्षण दरम्यान वादांकीत गटावर जाऊन पंचासमक्ष वादी व प्रतिवादी यांचे मध्ये तडजोड घडवून जागेवरच एकूण ११ दावे निकाली काढले असुन सदर १३ दाव्यांमध्ये वादी व प्रतिवादी यांचे मध्ये स्वयंस्फुर्तीने प्रेरणा देऊन आपआपसात समझोता करून तडजोड घडवुन खुले करुन देण्यात आलेले आहेत. तसेच स्थळनिरीक्षण करणेत येऊन वादी-प्रतिवादी यांना सुनावणी कामी संधी देण्यात येऊन एकूण २१ प्रकरणांमध्ये वादी व प्रतिवादी यांचे लेखी स्वरूपात युक्तीवाद दाखल करुन घेण्यात आलेला आहे. तरी या प्रकरणांमध्ये देखील योग्य तो गुणवत्तेवर निर्णय पारीत करणेत येऊन वर्षानुवर्षे रखडलेला वाद मिटविण्यात येऊन वंचित शेतक-यांना न्याय मिळणार आहे.
या अभियानात खालील प्राप्त प्रकरणांची मोहीम स्वरूपात निर्गती करणे. गाव नकाशा वरील अतिक्रमित व बंद झालेली विविध रस्ते लोकसहभागातून मोकळी करण्यासाठी विशेष मोहीम राबविणे. गांव तेथे स्मशानभूमी,दफनभूमी. पोटखराबा वर्ग अ खालील जमीन लागवडीखाली आणण्यासाठी विशेष मोहीम राबविणे,प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील गायरान,अशा विषयाबाबत कालबद्ध महसूल विजय सप्तपदी अभियान सुरू करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. असे आवाहन तहसील कार्यालय श्रीगोंदा यांनी केले आहे.
महसूल “विजय सप्तपदी ” अभियान राबविणेकामी तहसीलदार प्रदीपकुमार पवार व अपर तहसिलदार चारुशिला पवार यांनी दिनांक २२/०२/२०२१ ते ०५/०३/२०२१ या कालावधीत कालबध्द कार्यक्रमाचे नियोजन करुन वादांकीत गाडी रस्ते,पाणंद पांधण शेतरस्ते शिवाररस्ते शेतावर जाण्याचे पायमार्ग मोकळे करणे कामी प्रत्यक्ष गटावर जाऊन क्षेत्रभेटी दिलेल्या आहेत. ज्या ठिकाणी स्वतःहून शेतकरी पुढे येणार नाहीत व अपेक्षीत लोकसहभाग प्रयत्न करुनही न मिळाल्यास अतिक्रमीत व बंद रस्ते मोकळे करण्याबाबत उपलब्ध शासकीय तरतुदींचा देखील आधार घेऊन रस्ते मोकळे करणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. हे अभियान यशस्वीतेसाठी तहसीलदार प्रदीप कुमार पवार,अपर तहसिलदार चारुशिला पवार नायब तहसीलदार ढोले मॅडम,मंडलाधिकारी, तलाठी तसेच तहसिल कार्यालयाचे कर्मचारी परिश्रम घेत आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे