पुणे दि २० :- जेष्ठ समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले आणि देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मानाने गौरविले जावे. असा ठराव पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत करून केंद्र व राज्य शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अश्या पद्धतीने महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा असा ठराव करणारी पुणे महानगरपालिका देशातील पहिली महानगरपालिका असावी. हा ठराव पुणे महानगरपालिकेचे काँग्रेस पक्षाचे गटनेते आबा बागुल यांनी मांडला आणि सर्वच पक्षांनी एक मतांनी तो मंजूर केला त्या सर्वांचे आभार मानले अशी माहिती काँग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी दिली. आबा बागुल म्हणाले की , यापूर्वी थोर शिक्षणतज्ञ् महर्षी धोंडो केशव कर्वे व स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी या पुणेकर दिग्गजांना भारतरत्न पुरस्काराने गौरविले गेले आहे. महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेले अवर्निणय कार्य लक्षात घेऊन महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हे पुणेकरांचे विशेष भावनिक नाते आहे. त्यांचे राहते घर राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन केले गेले आहे. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले गेले आहे. पुणे महानगरपालिकेत देखील महात्मा ज्योतिराव फुले यांचे देखणे आकर्षक स्मारक करण्यातही मी पुढाकार घेतला होता. महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे उचित स्मारक पुण्यातच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्रात व देशात उभारले गेले आहे. त्यांच्या नावे शिष्यवृत्या देखील दिल्या जातात. मात्र भारतरत्न देऊन त्यांना गौरविले गेले नाही. हे लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न दिले जावे. असा ठराव पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मी काँग्रेस पक्षातर्फे मांडला व तो एक मताने मंजूर झाला ही आनंदाची बाब आहे. आता हा ठराव केंद्र व राज्य सरकारकडे पाठवला आहे. महाराष्ट्र सरकारने देखील याबाबत आवश्यक ती शिफारस केंद्र सरकारकडे करावी. व केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊन भारतरत्न या दोघांना जाहीर करावे. अशी आमची विनंती असून या दोघांनाही भारतरत्न दिला गेल्यास देशातील हे पहिले पती पत्नी भारतरत्न सन्मानाने सन्मानित पती पत्नी असतील हे देखील एक वेगळे वैशिट्य असेल. त्यांना भारतरत्न दिल्यास कोट्यवधी सामाजिक समानतेच्या सैनिकांना मोठे बळ मिळेल व सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने हे फार मोठे कार्य असेल असे मत आबा बागुल यांनी व्यक्त केले .