श्रीगोंदा दि १० :- औरंगाबाद जिल्ह्यातील बजाज नगर येथील अपहरण झालेल्या एका सहा वर्षाच्या मुलाची २७ वर्षीय तरुणाच्या ताब्यातून अवघ्या बारा तासात श्रीगोंदा पोलिसांनी सुखरूप सुटका केली.सागर गोरख आळेकर वय २७ वर्षे, रा.आळेकरमळा,श्रीगोंदा असे त्याचे नाव आहे.या कारवाईमुळे श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे व पोलीस कर्मचारी यांचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
सविस्तर वृत्त असे कि, दि.९जून रोजी औरंगाबाद येथील एका महिलेचे आणि श्रीगोंदा येथील सागर आळेकर यांचे प्रेम संबंध असल्याने तु माझे सोबत लग्न कर नाहीतर तुझ्या मुलास पळवून नेईल असे म्हणून सहा वर्षांच्या अभिनव यास आळेकर ने स्विफ्ट डिझायर गाडी नं.एम.एच.४२ ए.एच.९६५५ मध्ये अपहरण करुन श्रीगोंद्याकडे आणले आहे.
अशी माहिती महिलेच्या नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना दिल्यानंतर त्यानुसार पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांना नगर दौंड रोडवर पारगाव फाटा येथे नाकाबंदी करण्याचे आदेश देवून तात्काळ रवाना केले.नाकाबंदी दरम्यान सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहीतीनुसार स्विफ्ट डीझायर गाडी क्रमांक. एम. एच.४२ ए.एच.९६५५ ही अहमदनगर कडुन दौंडकडे जाताना दिसल्याने ती गाडी थांबवून त्यातून आरोपी सागर गोरख आळेकर वय २७ वर्षे, रा. आळेकरमळा, श्रीगोंदा यास त्याने पळवून आणलेल्या ०६ वर्षांच्या अभिनव रासकर सह ताब्यात घेतले. मुलास त्याच्या आईवडीलांच्या स्वाधीन केले आहे.
आरोपीस पुढील कारवाईसाठी प्रेमसंबंध असलेल्या महिलेच्या पतीच्या फिर्यादीवरुन एम.आय.डी.सी.वाळुंज, औरंगाबाद शहर पो.स्टे गु.रजि. नं.६५१/२०२१ भा.द.वि.क.३६३ प्रमाणे दाखल गुन्ह्यात एम.आय.डी.सी.वाळुंज,औरंगाबाद शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. दिलीप तेजनकर, चालक रमेश जाधव, पो.हे.कॉ अंकुश ढवळे, पो.कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ किरण बोराडे, पो.कॉ दादा टाके, पो.कॉ गोकुळ इंगवले यांनी केली आहे.
श्रीगोंदा प्रतिनिधी :-विजय कुंडलिक मांडे