पिंपरी चिंचवड दि १६ :- पिंपरी व शिवाजीनगर येथील न्यायालयात ज्या गुन्हेगारांना जामीनदार मिळू शकत नाही, अशा गुन्हेगारांना बनावट कागदपत्रे तयार करुन जामीनदार मिळवून देणार्या टोळ्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी कोर्टाकडे जाणार्या रोडवरील अंबिका वजन काट्यासमोरील बाजूला तसेच फोर्स मार्शलच्या पुढील बाजूला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाचवेळी छापे घालून ६ जणांना अटक केली आहे. सुनिल मारुती गायकवाड (वय ५२, रा.आळंदी, ता. खेड) नंदा एकनाथ थोरात (वय ४३, रा. इंद्रायणीनगर कॉलनी, आळंदी, ता. खेड) आणि पोर्णिमा प्रशांत काटे (वय ३०, रा. आळंदी, ता. खेड), सलमान ताजुद्दीन मुजावर (वय २४), समाधान प्रभाकर गायकवाड (वय २३) आणि श्रीधरन मगन शिंदे (वय २३, तिघे रा. जय भिमनगर, दापोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.व शिवाजीनगर न्यायालयाच्या बाहेर अशाच पद्धतीने पुणे पोलिसांनी छापे घालून शेकडो लोकांना आजवर जामीन मिळवून देणार्यांना अटक केली होती. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत. कोर्टात बनावट कागदपत्राद्वारे जामीनदार उभे करुन गुन्हेगारांना जामीन मिळवून देणारी टोळ्या कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून ६ जणांना अटक केली.
या टोळ्या शिवाजीनगर, पिंपरी व इतर कोर्टामध्ये गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या ज्या आरोपींना जामीनदार मिळत नाही. तसेच जे आरोपी जामीनावर सुटल्यानंतर पुन्हा कोर्ट कामासाठी हजर राहणार नाहीत, अशा आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सात बाराचे उतारे वगैरे सारखे खोटे शासकीय दस्तऐवज तयार करत. त्यानंतर बनावट नावे धारण करुन, ठराविक व ओळखीच्या वकिलांचे मागणीनुसार कोर्टात जामीनदार म्हणून हजर होऊन, बनावट कागदपत्रे संबंधित न्यायालयात देऊन आरोपींना कोर्टातून जामीनावर सोडवत असत. बनावट कागदपत्रे न्यायालयास खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल करुन वेगवेगळ्या गुन्ह्यातील अटक आरोपींचा जामीन घेण्यासाठी या टोळ्यांनी बनावट कागदपत्रांचा वारंवार वापर केला आहे. या टोळीला पकडल्यानंतर त्यांच्याकडे बोगस जामीनदार म्हणून हजर राहण्यासाठी बोगस कागदपत्रे आढळून आली आहेत. या सर्व प्रकारात वकिलांचा ही सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. व अधिक तपास पोउपनि पी.टी.चाटे , करीत आहेत.